Wednesday, January 20, 2010

लोकशाहीची यंत्रणा चालायला हवी ना? आपल्यापुढं जे पर्याय आहेत त्यातून एक निवडायचा आणि अधिक चांगल्या पर्यायाची वाट पाहायची!

नागरिकांनी मतदानासाठी मोठय़ा प्रमाणात बाहेर पडावे, मतदानाच्या दिवशी पिकनिकला वगैरे जाऊ नये, भयमुक्त मतदान करावे म्हणून स्वत: बादशहा आवाहन करत होता. बिरबलानेही ठिकठिकाणी सभा घेऊन नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. परंतु एका बुद्धिवाद्याने या उलट प्रचार सुरू केला. ‘सगळे उमेदवार भ्रष्ट आहेत, खोटारडे आहेत, मतलबी आहेत, तेव्हा मतदान करू नका.’ सामान्य माणूस अनेकदा आवश्यक असेल तेव्हा चिरीमिरी देऊन स्वत:ची कामे करून घेतो, परंतु नेत्यांच्या भ्रष्ट आचाराविषयी जागरूक असतो. त्यामुळं, मतदानाला विरोध करणाऱ्या बुद्धिवाद्याच्या सभांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला. ते पाहून बादशहा काळजीत पडला. बिरबलही विचारात पडला. मग बिरबलानं त्याची चौकशी यंत्रणा कामाला लावली. चौकशी पूर्ण झाल्यावर बिरबलानं बुद्धिवादी नेत्याला भोजनाचं निमंत्रण दिलं. गप्पा-टप्पा, चर्चा असं बरंच काही झाल्यावर रात्री उशीरा सगळ्यांना सपाटून भूक लागली. मग जेवण वाढलं जाऊ लागलं. बुद्धिवाद्याकडे पाहून बिरबल म्हणाला, ‘माफी असावी. आपण नॉनव्हेज खात नाही आणि व्हेजमध्ये सुध्दा तुमची नावडती वांग्याची, भेंडीची भाजी आहे. तेव्हा आपण आज जेवला नाहीत तरी चालेल!’ बुद्धिवादी म्हणाला, ‘अहो, आता एव्हढय़ा रात्री निवड करायला कुठं वेळ आहे, पोट भरलं नाही तर शरीराची यंत्रणा कशी चालेल?’ बिरबल हसत हसत म्हणाला, ‘माझंही तेच म्हणणं आहे. लोकशाहीची यंत्रणा चालायला हवी ना? आपल्यापुढं जे पर्याय आहेत त्यातून एक निवडायचा आणि अधिक चांगल्या पर्यायाची वाट पाहायची!’ बुद्धिवादी खजिल झाला आणि त्यानं मसाल्याची वांगी ताटात वाढून घेतली. अर्थातच मतदानविरोधी चळवळ त्यानं बंद केली. बिरबलाची ‘डिनर डिप्लोमसी’ बादशहाला बेफाम आवडली आणि त्यानं बिरबलाला ‘रेशमी कबाब’चा आस्वाद घेण्यासाठी आमंत्रित केलं!

Tuesday, January 19, 2010

इतिहासातील चुकांमधून वर्तमानाने धडा घ्यायचा तर इतिहास जसाच्या तसा लिहिला जाणं आवश्यक नाही का?

बादशहानं आपल्या मुलाचं इतिहासाचं पाठय़पुस्तक सहज म्हणून चाळलं आणि ते वाचता वाचता तो भयंकर संतापला. पाठय़पुस्तकात बादशहाच्या कर्तृत्ववान खापर पणजोबांवर एक धडा होता. त्या धडय़ात बादशहाच्या खापर पणजोबांविषयी दिलेली काही माहिती बादशहाला रुचली नाही. बादशहानं संतापून ते पुस्तक भिरकावून दिलं आणि बिरबलाला बोलावणं धाडलं. बादशहाला एवढं संतापलेलं बिरबलानं कधीच पाहिलेलं नव्हतं. ‘खाविंद, एवढं संतापायला काय झालंय आज?’ असं त्यानं विचारताच बादशहानं इतिहासाच्या पुस्तकातील धडय़ाविषयी त्याला सांगितलं. बिरबल म्हणाला, ‘खाविंद, राज्यकर्त्यांची आणि सत्ताधिशांची मर्जी सांभाळणारे, लाळघोटे इतिहासकार आपल्या राज्यात नाहीत, याचा तुम्हाला खरं तर अभिमान वाटायला हवा!’ बादशहा म्हणाला, ‘परंतु हे सगळं खोटं आहे! बिरबल म्हणाला, ‘ठीक आहे, मग काय करावं, अशी तुमची इच्छा आहे?’ बादशहा म्हणाला, ‘हे सर्व बदलून टाका, माझ्या खापरपणजोबांविषयी काय लिहायचं ते मीच सांगेन! बादशहाच्या आदेशानुसार नवा इतिहास लिहिण्याचं काम सुरू करण्यात आलं. त्यानंतर चार दिवसांनी बादशहा आणि बिरबल सकाळी फिरायला गेले असताना बादशहाला ठेच लागली आणि त्याचं पायाचं बोट रक्ताळलं. राजवाडय़ावर परत आल्यावर बादशहाचा धाकटा मुलगा त्याच्या पायाकडे पाहत म्हणाला, ‘अब्बाजान, काय झालं?’ बादशहाला बोलण्याची संधी न देता बिरबल म्हणाला, ‘‘रस्त्यात एक साप आडवा आला, खाविंदांनी त्याला लाथेनं उडवलं. त्यामुळे बोटाला जखम झाली. मुलानं बापाकडे अभिमानानं पाहिलं आणि तो बापाचा पराक्रम आईला सांगण्यासाठी घरात पळाला. बादशहा विस्मयानं बिरबलाकडे पाहत म्हणाला, ‘‘अरे त्याला खोटं का सांगितलंस! खरं सांगितलं असतं तर त्या रस्त्यानं दगड आहेत, सांभाळून चाललं पाहिजे हे तरी त्याला कळलं असतं!’
बिरबल म्हणाला, ‘खाविंद, पुढं भविष्यात तुमचा एखादा खापर पणतू खोटा इतिहास लिहिल, त्यापेक्षा आपण आताच त्याची व्यवस्था केलेली बरी!’
अर्थात बादशहा हे ऐकून वरमला. त्याची ती स्थिती पाहून बिरबल म्हणाला, ‘खाविंद, राज्यकर्त्यांमध्ये आणि समाजाच्या नेतृत्वामध्येच जर इतिहास पचवण्याची ताकद नसेल तर समाजात ती कुठून येणार? आणि इतिहासातील चुकांमधून वर्तमानाने धडा घ्यायचा तर इतिहास जसाच्या तसा लिहिला जाणं आवश्यक नाही का?’ बादशहा हे ऐकून खिन्न झाला, कारण त्याची विवेकबुद्धी शाबूत होती.

Tuesday, January 12, 2010

समाजाला लांच्छनास्पद असलेल्या गोष्टी जगाला सांगणं, उजेडात आणणं हे कोणत्याही कलेचं एक महत्त्वाचं काम आहे

बादशहाच्या दरबारातील एका कलावंतानं राज्याबाहेर जाऊन आपल्या नाटय़कृतीचे प्रयोग केले आणि त्या नाटय़कृतीचं सगळीकडे प्रचंड कौतुक झालं. त्या नाटकाला अनेक राज्यांमध्ये सन्मानित केलं गेलं. तो कलावंत आपला संच घेऊन राज्यात परतला तेव्हा राज्यातही त्याचं मोठं स्वागत करण्यात आलं. बादशहानं त्या नाटय़कृतीच्या लेखकाचा, दिग्दर्शकाचा आणि कलावंतांचा दरबारी सन्मान करायचं ठरवलं. ह्य़ा सत्कार सोहळ्याला मंत्री, त्यांचे कुटुंबीय आणि सामान्य नागरिकांनीही खच्चून गर्दी केली. बादशहा आपल्या दोन्ही बेगमसह उपस्थित होता. आधी त्या नाटकाचा रंगतदार प्रयोग झाला. टाळ्यांच्या कडकडाटात दिग्दर्शक मंचावर उपस्थित झाला. खुद्द बादशहानं त्याच्या सर्जनशीलतेला लवून कुर्निसात केला. शाही सन्मान प्रदान करण्याची घटीका आली आणि एक दरबारी पंडीत रागाने थरथरत उभा राहिला व म्हणाला, ‘खाविंद, आपल्या राज्यातील गरीबी आणि गरिबांची वस्ती या नाटकात दाखविली आहे. या नाटकाचा सन्मान करून इतर राज्यांनी आपल्याला खिजवलं आहे, हिणवलं आहे. तेव्हा आपणही याचा सन्मान करणं हा मूर्खपणा आहे असं मला वाटतं.’ त्या पंडिताच्या हुषारीचा दराराच असा होता की, उपस्थित अंतर्मूख झाले. अनेकांच्या चेहऱ्यावर चलबिचल दिसू लागली. बादशहाच्या नजरेचा इशारा ओळखून बिरबल उठून उभा राहिला व त्या पंडिताला म्हणाला, ‘आपण आम्हाला आदरणीय आहात. मी एक प्रश्न विचारू का?’ पंडितानं होकार दिल्यावर बिरबल म्हणाला, ‘ही गरीब वस्ती म्हणजे काय आहे असं वाटतं आपल्याला?’ पंडीत विजयी मुद्रेनं म्हणाला, ‘राज्याच्या सुदृढ शरीराला आलेली किळसवाणी गाठ आहे ती!’ बिरबल हसत उत्तरला, ‘मग गाठ लपवून ठेवणं राज्याच्या हिताचं आहे की ती जगाला दाखवून तिच्यावर इलाज करणं हिताचं आहे?’ प्रश्न ऐकून पंडिताचा चेहरा उतरला. ती संधी घेत बिरबल म्हणाला, मला वाटतं, समाजाला लांच्छनास्पद असलेल्या गोष्टी जगाला सांगणं, उजेडात आणणं हे कोणत्याही कलेचं एक महत्त्वाचं काम आहे. ते या नाटय़कृतीनं केलं आहे. आता त्यावर उपाय शोधण्याचं पुढलं काम आपण करायचं आहे.’ टाळ्यांचा कडकडाट झाला आणि बादशहानं बिरबलाकडे कृतज्ञतेचा कटाक्ष टाकत कार्यक्रम पुढं सुरू केला.

Sunday, January 3, 2010

तो तरुण खरं तर तुमच्या हिताचं सांगत होता, परंतु तुमची मन:स्थिती ठीक नसल्यानं तुमचा तोल गेला खाविंद!

लोकसत्ता पेपर मधून काही निवडक लेखाची कात्रणे तुमच्यासाठी --- यशवंत गावडे

बादशाह आणि बिरबल शेजारच्या राज्यातली वृत्तपत्रं उत्सुकतेनं चाळत बसले होते. त्या देशातल्या एका सभ्य व्यक्तीनं ‘विरोधी पक्ष अस्थीर असणं बरं नव्हे’ असं म्हटलं तर त्याला ‘तुम्ही तुमचं बघा, आमचं आम्ही बघून घेऊ असं’ उत्तर विरोधकांनी दिलं. ते वाचनू बादशहा म्हणाला,‘अरे ही माणसं चांगल्या मनानं सांगितलंले सुद्धा ऐकून का घेत नाहीत? ’ आपल्या हिताची गोष्टही ऐकून घ्यावीशी वाटत नाही’ बादशहाला काही ते पटलं नाही. दोघांमध्ये बराच वेळ ह्यावर वाद सुरू होता. दुसऱ्या दिवशी सकाळी बादशहा आणि बिरबल घोडय़ांवरून रपेट मारायला जाणार होते. परंतु बादशहाचा आवडता घोडा आजारी आहे असं पार्टीच्या प्रमुखानं सांगितलं. बादशहाचा मूड गेला. तो बिरबलाला म्हणाला, ‘आज माझा अंगरखाही नीट बसलेला नाही आणि घोडा आजारी आहे. आपण पयीच फिरायला जाऊया.’ दोघे फिरायला निघाले. बिरबल बादशहाला म्हणाला,‘पायीच जायचं आहे तर मग नेहमीपेक्षा वेगळ्या रस्त्यानं जाऊया!’ दोघेही निघाले. थोडं चालून गेल्यावर बादश्हा म्हणाला,‘हा रस्ता दुरूस्त करण्यासाठी ह्यावर्षी आपण निधी मंजूर केला होता ना?’ बिरबल म्हणाला,‘होय खाविंद, रस्ता बहुतेक नीट दुरूस्त केला नसणार. त्यामुळे पावसाळ्यात पुन्हा उखडला.’ थोडं पुढे एका इमारतीचं काम अध्र्यावरच बंद पडून शेवाळ धरलं होतं. ‘हे असं बंद का पडलंय?’ बादशहानं विचारलं. ‘माफी असावी खाविंद. आपले अधिकारी पैसे खाऊन बांधकामांना परवानगी देतात आणि मग त्याच व्यवहारात कमी जास्त झालं की काम बंद पाडतात.’ बिरबल म्हणाला. हे ऐकून बादशहाचा मूड अधिकच खराब झाला. भरीस भर म्हणून चालता चालता बादशहाच्या चपलेचा अंगठा तुटला. कसा तरी लंगडत, अडखळत बादशहा परतीच्या वाटेला निघाला. त्याला असं चालताना पाहून एक तरूण थांबला. त्यानं आपली पादत्राणं काढली आणि बादशहाला म्हणाला,‘हुजूर, आपण माझी पादत्राणं घालून जा. आपली चप्पल दुरूस्त करून मी राजवाडय़ावर आणून देतो.’ त्याचं ते बोलणं ऐकून बादशहाचं पित्त खवळलं आणि तो म्हणाला,‘तू एवढा क्षुल्लक नागरिक आणि तुझी ही हिम्मत? तुझी पादत्राणे बादशहाला घालायला देतोस़? अपमान करतोस माझा?’ तो तरुण भीतीने चळचळा कापू लागला. बिरबलानं त्याला जायला सांगितलं आणि बादशहाला म्हणाला,‘तो तरुण खरं तर तुमच्या हिताचं सांगत होता, परंतु तुमची मन:स्थिती ठीक नसल्यानं तुमचा तोल गेला खाविंद!’ त्या तशा अवस्थेतही बादशहाला हसू फुटलं. त्यानं त्या तरुणाला बोलावलं, त्याची पादत्राणं घातली आणि बिरबलाला म्हणाला,‘झाला का मला धडा शिकवून? चल आता, चहाची तलफ आली आहे जोरदार!’