Monday, May 23, 2011

अंबानींचा महाल... टाटांचा नॅनो बंगला




शेजा-याच्या घरापेक्षा आपले घर अधिक चांगले आणि टुमदार असावे, अशी कुणाही सामान्य माणसाची अपेक्षा असते. मग अब्जावधी रूपयांची उलाढाल करणा-या मुकेश अंबानी आणि रतन टाटा यांच्यासारख्या बड्या उद्योगपतींबद्दल तर बोलायलाच नको... ४ हजार कोटी रूपये खर्च करून मुकेश अंबानींनी अँटिलिया हा २७ मजली राजमहाल बांधला. परंतु टाटा साम्राज्याचे सर्वेसर्वा असलेले रतन टाटा मात्र छोटेखानी बंगल्यात राहण्यातच धन्यता मानतात.

श्रीमंतीचं अवास्तव प्रदर्शन करण्यापेक्षा समाजातील उपेक्षित, वंचितांचं दुःख कसं हलकं करता येईल याकडे लक्ष देणं आवश्यक आहे, असा टोला हाणत रतन टाटा यांनी ब्रिटिश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुकेश अंबानींच्या विलासी राहणीमानावर टीका केली होती. आता आपण असे बोललोच नव्हतो, असा खुलासा टाटांनी केला आहे. परंतु टाटांची ही कथित टीका किती अचूक होती, याचा प्रत्यय टाटा आणि अंबानी यांच्या राहत्या घरांवर नजर फिरवल्यानंतर येतो.

अंबानी यांचा अँटिलिया नावाचा बहुमजली महाल आणि टाटांचा केबिन्स बंगला यांच्यातील तफावत सहजपणे जाणवते. अंबानी यांनी अल्टामाउंट रोडवर अँटिलिया हा २७ मजली भव्य प्रासाद उभारला आहे टाटांनी मात्र कुलाब्यामध्ये केबिन्स हा छोटेखानी ३ मजल्यांचा बंगला बांधला आहे. आपल्या प्रासादाच्या शेवटच्या मजल्यावर आल्यावरच अंबानींना समुद्र-दर्शन होते तर टाटांना मात्र बंगल्यासमोरच अथांग समुद्र न्याहाळता येतो.

अंबानी यांच्या सेवेत ६०० कर्मचा-यांची फौज तैनात आहे तर टाटांच्या सेवा-चाकरीत आहेत फक्त १० जण. अँटिलिया या अंबानींच्या आधुनिक महालात अत्याधुनिक योगा-कक्ष, आरोग्य-केंद्र, नृत्य-विभाग, बॉलरूम तसंच मुंबईतील उकाडा टाळण्यासाठी आईस-रूमची सुविधा आहे. याशिवाय चारमजली हँगिग गार्डन आणि मनोरंजनाकरता ५० जण बसू शकतील असं मिनी-थिएटर उभारण्यात आलं आहे.

अंबानी यांच्याकडे तब्बल १६८ गाड्या आहेत तर जगातील उत्तमोत्तम आणि दर्जेदार गाड्यांची निर्मित्ती करणा-या टाटांच्या दाराशी आहेत अवघ्या १० गाड्या. सुमारे ४,७७० स्क्वेअर फूटावर वसलेल्या अंबानींच्या अँटिलियाची किंमत आहे- ४,५०० कोटी रुपये. तर दुसरीकडे १,२०० स्क्वेअर फूट एवढ्या क्षेत्रफळाच्या टाटांच्या बंगल्याची किंमत आहे १० कोटी रुपये. आहे की नाही डिफरन्स दोन साम्राज्याधिपतींच्या राहणीमानात 

टाटांचा बंगला छोटेखानी असला तरी त्याची रचना टाटांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन करण्यात आली आहे. वाचनाची जबरदस्त आवड असणा-या टाटांकरता तळमजल्यावर अभ्यासिकेबरोबरंच सुसज्ज ग्रंथालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. पोहण्याची आवड असणा-या टाटांकरता दुस-या मजल्यावर स्विमिंग पूलची सोय करण्यात आली आहे.
टाटांच्या केबिन्स या बंगल्याचं आकर्षण आहे- वैयक्तिक जिम. याच्या जोडीला आहे मीडिया रुम, मास्टर बेडरूम आणि अतिरिक्त जिम. तिस-या मजल्यावर आकाशाशी थेट संवाद साधता येईल अशी टेरेस आहे आणि लाँऊजची सोय आहे.

आपल्या भव्य प्रासादातून कार्यालयीन कामासाठी देश-परदेशात जाण्यासाठी अंबानींनी तीन हेलिपॅडही उभारली आहेत. अर्थात लष्कर आणि पर्यावरण मंत्रालयाच्या रीतसर परवानगी शिवाय हे हेलिपॅड वापरू शकत नाहीत, तो भाग वेगळा. तर टाटांनी मात्र घरात अशी हेलिपॅड नको अशी धोरणात्मक भूमिका घेतली होती.

एकंदरीत गर्भश्रीमंत टाटांनी अंबानींच्या आलिशान आणि विलासी निवासावर केलेली टीका योग्यच होती असं म्हणायला हरकत नाही.


Thanks to Mata Link to original post - http://goo.gl/EjMkI