Tuesday, December 29, 2009

असुरक्षितता, अस्थिरता, भीती, वास्तवाकडे पाठ फिरविण्यातली अपरिहार्यता यातून प्रत्येक क्षण साजरा करण्याची वृत्ती वाढत आहे

लोकसत्ता पेपर मधून काही निवडक लेखाची कात्रणे तुमच्यासाठी --- यशवंत गावडे

राजधानीवर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता आणि चार दिवस सर्वाना वेठीला धरलं होतं. राजधानीच्या रक्षक सैनिकांनी जीवाची बाजी लावून हल्लेखोरांना जेरबंद केलं. त्या घटनेला एक वर्ष पूर्ण झालं तेव्हा आपल्या सैनिकांच्या शौर्याची आणि जनतेच्या धीराची पावती म्हणून राज्यभर कार्यक्रम आयोजित करावेत, असा आदेश बादशहानं दिला होता. राजधानीत अनेक संघटनांनी, अनेक संस्थांनी आणि लोकांनीही उत्स्फूर्तपणे वेगवेगळे कार्यक्रम ठरविले होतेच. आपल्या जनतेची ही संवेदनशीलता पाहून बादशहा खूश झाला. प्रत्यक्ष तो दिवस उगवला तेव्हा बादशहा दिवसभर कुठं कुठं फिरून कार्यक्रम पाहत होता आणि दिवसभर, रात्रभर फिरून त्याच्या मनावर निराशेचे मळभ दाटून आले. सर्वत्र जणू उत्सव सुरू होते. वेदनेचा ठाव ठिकाणा नव्हता, जबाबदारीची जाणीव नव्हती आणि गांभीर्याचा अभाव होता. मद्याचा महापूर, रंगीबेरंगी वस्त्रे, धुंद नाचगाणी आणि शौर्याचे दिखाऊ पोवाडे सुरू होते. कार्यक्रमांचे आयोजक शहीदांवर जणू कुरघोडी करीत स्वत:च मिरवित होते. हिच का आपली ती संवेदनशील जनता, असा बादशहाला प्रश्न पडला. बादशहा पहाटे खिन्न मनाने राजवाडय़ावर परतला. सकाळी बिरबल आला तेव्हा बादशहानं आपल्या भावना व्यक्त केल्या आणि म्हणाला, ‘मला फार वाईट वाटले बिरबला, रात्री सर्वत्र जणू हल्ल्याच्या स्मृती साजऱ्या केल्या जात होत्या, कुठंही गांभीर्य नव्हतं, नुसता दिखाऊपणा!’
बिरबलाला बादशहाची मन:स्थिती कळली. तो म्हणाला, ‘खाविंद, तुमची निराशा साहजिकच आहे, परंतु मला तुम्हाला आणखीही काही सांगायचं आहे.’ अर्थातच बादशहानं बिरबलाला परवानगी दिली. त्यानुसार बिरबलानं तुरुंगातील एक कैदी हजर केला. तो कैदी शिक्षेच्या प्रतीक्षेत होता. बिरबलाच्या योजनेनुसार बादशहा त्या कैद्याला म्हणाला, ‘‘तुला फाशीची शिक्षा देण्याचं ठरलं आहे. तुझ्या फाशीला अजून एक आठवडा अवकाश आहे, तोवर तू मुक्त आहेस. काय हवं ते कर आणि आठवडाभरानं परत ये!’’ कैदी तिथून निघाला, अर्थातच त्याच्यावर सैनिकांची पाळत होती. आठवडाभरानं सैनिकांनी अहवाल सादर केला. त्यानुसार तो कैदी त्या काळात, खाणं-पिणं, जुगार खेळणं, स्त्रियांचा सहवास यात मनसोक्त रमला होता!
हा अहवाल ऐकल्यावर बादशहा बिरबलाला म्हणाला, ‘यातून तुला काय सिद्ध करायचं आहे बिरबल?’ बिरबल म्हणाला, ‘‘खाविंद, राजधानीवरील हल्ल्याच्या स्मृतिदिनी तुम्ही जे पाहिलं ते सगळं याच पठडीतलं होतं. असुरक्षितता, अस्थिरता, भीती, वास्तवाकडे पाठ फिरविण्यातली अपरिहार्यता यातून प्रत्येक क्षण साजरा करण्याची वृत्ती वाढत आहे. निमित्ताचे गांभीर्य लक्षातघेण्याऐवजी निमित्त पाहून मौजमजा करण्याचं प्रमाण वाढलं आहे.. रात्री मद्यधुंद होऊन नाचणारे अनेक जण सकाळी एकांतात रडत असतात आणि ते मात्र जगाला कळत नाही!’’
बादशहा गंभीर झाला, बिरबल म्हणाला, ‘खाविंद, हे सगळं पाहून, तुमच्या,माझ्या सारख्या काही व्यक्ती अस्वस्थ होतात हेच फक्त समाधान आहे!’ बादशहाला त्याक्षणी बिरबलाचा जेवढा आधार वाटला तेवढा त्यापूर्वी कधीही नव्हता वाटला!