Sunday, September 5, 2010

गोविंदा ... दहीहंडी : मूठभर निराशेतली चिमूटभर आशा !

पावसामुळं सगळे व्यवहार थंडावलेले होते. मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीला उपस्थित असलेले सर्व मंत्रीही आळसावलेले होते. सगळं वातावरण असं सुस्तावलेलं पाहून बादशहानं रेशमी कबाब बनविण्याचा आदेश दिला. खमंग कबाब आणि पुदिन्याची ताजी पाने चांदीच्या नक्षीदार थाळ्यांमध्ये आली तेव्हा मग शेरो-शायरी गप्पा यांना ऊत आला. एकेक मजेदार किस्से सांगितले जाऊ लागले आणि वातावरण अगदी खुमासदार झाले. मध्येच बादशहानं हात उंचावला आणि म्हणाला, ‘तुम्हा सगळ्यांनाच माझा एक प्रश्न आहे, ज्याचं तुम्ही उत्तर द्यायचं ते लगेच सिद्धही करून दाखवायचं आणि उत्तर वैशिष्टय़पूर्णही हवं!’ सर्व मंत्र्यांनी एका स्वरात उत्तर दिलं, ‘कुबुल खाविंद!’ मग बादशहानं मसालेदार चहाचा एक घोट घेतला व आपला प्रश्न विचारला, ‘जगण्यासाठी काय हवं असतं?’ सर्व मंत्री, हा म्हटलं तर सोपा आणि म्हटलं तर अवघड प्रश्न ऐकून विचारात पडले. प्रश्नाचं उत्तर लगेचच सिद्ध करणं हे एक मोठं आव्हान होतं. अखेर एक ज्येष्ठ मंत्री उभा राहिला आणि म्हणाला, ‘खाविंद, जगण्यासाठी सुख हवं असतं असं मला वाटतं, परंतु ते आत्ता लगेच सिद्ध नाही करता येणार!’ बादशहा म्हणाला, ‘सुखाचा लवकरच कंटाळा येतो हे सार्वकालिक सत्य आहे.’ प्रत्येक मंत्री मनातल्या मनात बादशहाच्या प्रश्नाचं उत्तर जुळवत होता; परंतु ते उत्तर लगेचच सिद्ध कसं करावं हा पेच त्याला पडत होता. अखेर सर्व मंत्री बिरबलाला आग्रह करून म्हणाले, ‘आता तूच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकशील.’ मग बादशहानंही आग्रह धरला तेव्हा बिरबल म्हणाला, ‘जगण्यासाठी मूठभर निराशा आणि चिमूटभर आशा हवी असते आणि यात कोणत्याही काळात बदल झालेला नाही, होणारही नाही.’ बादशहानं उत्तरावर समाधान व्यक्त केलं आणि म्हणाला, ‘परंतु हे तू आत्ताच्या आत्ता सिद्ध कसं करून दाखवशील?’ बिरबल म्हणाला, ‘दाखवतो, पण त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत इथून बाहेर पडावं लागेल.’ मग सगळेच तिथून एकत्र बाहेर पडले. बाहेर एका चौकात प्रचंड गर्दी होती. लोक मद्यधुंद, बेहोष होऊन नाचत होते. चौकाच्या मध्यभागी पन्नास लाखांची दहीहंडी बांधलेली होती. त्या गर्दीला गोविंदाच्या सांस्कृतिक परंपरेशी काही देणं-घेणं नव्हतं. सर्वाचं लक्ष होतं पन्नास लाखांवर! ते पाहून बादशहा भयंकर निराश झाला. मग बिरबल बादशहाला घेऊन दुसऱ्या एका चौकात गेला, तिथं दहीहंडीला पैसे वगैरे नव्हते, फक्त दहीकाल्याचे मटके बांधलेले होते, काही लोक उत्साहाने पाणी फेकत होते, परंतु गर्दी नव्हती. खरं तर शुकशुकाटच होता. ते पाहून बादशहा म्हणाला, ‘पैसे नसूनही गोविंदा मंडळं थर उभारताहेत ही केवढी आनंदाची गोष्ट आहे!’ बिरबल म्हणाला, ‘‘यालाच मी मूठभर निराशेतली चिमूटभर आशा म्हणतो!’ बिरबलाच्या या उत्तरानं खूश झालेल्या बादशहानं संपूर्ण मंत्रिमंडळालाच आग्रहानं दुपारच्या शाही खान्यासाठी थांबवून घेतलं!

धन्यवाद लोकसत्ता ... ....    Link to original article

No comments:

Post a Comment