Sunday, January 2, 2011

माणसाच्या अस्तित्वाचे रुपांतर आठवणींमध्ये होते


बादशहाच्या अब्बाजानचा इंतकाल झाला. त्यांचं वय झालं होतं आणि अनेक व्याधींनी त्यांना घेरलं होतं. वेदनांमधून त्यांची सुटका झाली, मृत्यूनं त्यांना जवळ केलं. बादशहाचा महाल शोकसागरात बुडाला. बादशहानं अन्नपाणी सोडलं आणि तिसऱ्या दिवशी स्वत:ला एका कक्षात कोंडून घेतलं. बेगम संचित झाल्या, मंत्रिमंडळ काळजीत पडलं, प्रजा भयभीत झाली. बिरबलानं सर्वाना धीर दिला आणि तात्पुरती राज्याची सूत्रं स्वत:कडे घेतली. बादशहाच्या दु:खाची तीव्रता कमी होऊन तो स्वत:च बाहेर येईल यासाठी चार दिवस वाट पाहिली; परंतु बादशहा दु:खाच्या आवर्तनातून बाहेर येण्याचे चिन्ह दिसत नव्हते. अखेर बिरबलाने एका कागदावर बादशहाला पत्र लिहिले. ‘खाविंद, आपले दु:ख आम्ही समजू शकतो, परंतु आपण बादशहा आहात, लाखोंचे पोषिंदे आहात याचा विसर पडू देऊ नका. एखादी व्यक्ती, एखादी वस्तू जाते, म्हणजे ती पूर्णपणे जात नाही, तिचे फक्त रुप बदलते, अस्तित्व संपत नाही. तेव्हा अब्बाजानचा इंतकाल म्हणजे त्यांचा अंत, असे समजू नका.’

बिरबलाचे पत्र वाचून बादशहाने आपले दु:ख आवरते घेतले आणि तो बाहेर आला. राज्याचा गाडा पूर्ववत सुरू झाला. काही दिवस गेले. बादशहा आणि बिरबल एका संध्याकाळी मावळता सूर्य पाहत बसलेले होते, तेव्हा बादशहाने बिरबलाच्या पत्राचा विषय काढला आणि म्हणाला, ‘माणूस संपला की सगळे संपतेच रे बिरबल!’ बिरबल छान हसला आणि म्हणाला, ‘माफी असावी खाविंद, कुठलीच गोष्ट संपत नाही. इथे सूर्य मावळताना दिसतो तेव्हा तो कुठेतरी उगवत असतो. लाकूड जळून कोळसा होतो. कोळसा जळून राख होते. पाणी वाहून जाते ते कुठेतरी जातच असते. वस्तूचे फक्त रुप, आकार, रंग, अवस्था बदलत असतात!’ बिरबलाकडे रोखून पाहात बादशहा म्हणाल, ‘आणि मनुष्याचे काय उरते?’
बादशहाचे दोन्ही हात आपल्या हाती घेत बिरबल हळव्या स्वरात म्हणाला, ‘माणसाच्या अस्तित्वाचे रुपांतर आठवणींमध्ये होते खाविंद! अब्बाजान तुमच्या आठवणींमधून कधी पुसले जाणार आहेत का?’ बादशहानं आंसूभरल्या डोळ्यांनी बिरबलाला मिठीत घेतलं आणि त्याचं अस्तित्व महसूस केलं. त्यांच्या मिठीतून बाहेर येत बिरबल म्हणाला, ‘मीही गेलो तर असाच शिल्लक राहीन, तुमच्या स्मृतिंमध्ये!’ बादशहा अकबर कातर स्वरात म्हणाला, ‘खबरदार, असं काही बोललास तर!’ पायात आपले बूट चढवत बिरबल म्हणाला, काळजी करू नका, तुम्ही गेल्यावर तुमच्याही आठवणी राहतील, निसर्गाचे नियम सगळ्यांना सारखेच लागू होतात!’ वास्तवाच्या जाणिवेनं येणारी एक अनोखी उदासी बादशहाच्या चेहऱ्यावर दाटून आली! बिरबल निघून गेला.
धन्यवाद लोकसत्ता ... ....    Link to original article

No comments:

Post a Comment