Wednesday, January 26, 2011

महाराष्ट्राचा झाला बिहार

अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळले


प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला इंधन भेसळखोरांचे कृत्य
‘महाराष्ट्राचा बिहार होऊ घातला आहे’ हे वाक्य आता इतिहासजमा झाले असून गुंडगिरीमध्ये आता महाराष्ट्राने बिहारला खूप मागे टाकले आहे, असे म्हणण्याची पाळी आली आहे. ‘कायद्याच्या राज्या’चे अस्तित्वच उरलेले नाही अशी भीषण घटना आज नाशिक जिल्ह्यातील पानेवाडी येथे घडली. भर रस्त्यावर इंधनतेलाची भेसळ करणाऱ्या गुंडांच्या टोळीला अटकाव करण्याचे धाडस दाखविणारे अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना या गुंडांनी त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळले. भर रस्त्यात आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या जळितकांडाने संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. पानेवाडीत हे जळितकांड घडत असताना ठाण्यात राजकारणी व बिल्डरांचे काळे व्यवहार उघडय़ावर आणण्याचे धाडस दाखविणाऱ्या आणि माहिती अधिकार कायद्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विक्रांत कर्णिक या कार्यकर्त्यांवर काही अज्ञात गुंडांनी पानेवाडीप्रमाणेच दिवसाढवळ्या आणि भररस्त्यातच प्राणघातक हल्ला केला. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येस पोलीस, न्यायालय, शिक्षा अशा कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता करण्यात आलेल्या हल्ल्याच्या या दोन घटनांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे जाहीरपणे टांगली गेली आहेत.

इंधन भेसळीला अटकाव करण्यासाठी गेलेले मालेगावचे अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे (४७) यांना अक्षरश: जिवंत जाळण्यापर्यंत भेसळखोरांची मजल गेल्याने त्याबद्दल सर्वत्र शोकसंतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या अत्यंत घृणास्पद आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेचे तीव्र पडसाद प्रशासकीय पातळीवर उमटले असून त्याच्या निषेधार्थ येत्या २७ तारखेला राज्यव्यापी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी प्रमुख संशयित पोपट शिंदे याच्यासह चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधितांवर कडक कारवाई करण्याबरोबरच प्रसंगी मोक्का लावण्यासही मागेपुढे पाहिले जाणार नाही, असे घटनास्थळी भेट देणारे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. सोनवणे यांच्या पश्चात पत्नी विजया, कुणाल व पंकज हे दोघे मुलगे, आई, वडील असा परिवार आहे.
मनमाड नजिकच्या पानेवाडी परिसरात सर्व प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांचे डेपो असून या भागातून राज्यात तसेच परराज्यातही बहुतांश भागात इंधन पुरवठा केला जातो. त्यामुळे पेट्रोल, डिझेल व घासलेट पुरवठय़ाच्या या केंद्राभोवतालचा परिसर भेसळखोरांचा अड्डा म्हणूनही परिचित आहे. हा परिसर मालेगाव महसूल मंडलाच्या अखत्यारित येतो. मंगळवारी, प्रजासत्ताकदिनाच्या आदल्या दिवशी दुपारच्या सुमारास मालेगावचे अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे मनमाडहून नांदगावकडे निघाले असता परिसरातल्या जोंधळेवाडी येथे एका ढाब्यावर टँकर संशयास्पद अवस्थेत उभा असल्याचे त्यांना दिसले. इंधन भेसळीचा संशय आल्याने ते आपल्या शासकीय वाहनातून उतरून टँकरजवळ गेले असता काही जण टँकरमधून घासलेट काढताना दिसले. त्याला आक्षेप घेवून सोनवणे यांनी प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला असता संबंधितांनी त्यांच्याशी हुज्जत घालणे सुरु केले. एकंदर परिस्थिती पाहून सोनवणे यांनी आपल्या भ्रमणध्वनीद्वारे भेसळीचे चित्रण सुरु केले व त्याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ते पाहताच भेसळखोरांपैकी दोघा-तिघांनी सोनवणे यांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले. सोनवणे यांच्यासमवेत असलेले त्यांचे स्वीय सहायक राजू काळे व चालक गवळी यांना देखील संबंधितांनी मारहाण सुरु केली. उभयतांनी तेथून स्वत:ची कशीबशी सुटका करुन घेतली व पळ काढला. तथापि, सोनवणे तेथेच कोसळले व घटनास्थळीच त्यांचा मृत्यू ओढवला. सोनवणे एवढे गंभीर भाजले होते की त्यांच्या मृतदेहाचा अक्षरश: कोसळा झाला. यावेळी झालेल्या झटापटीत प्रमुख संशयित पोपट शिंदे हा देखील भाजला असून त्याला मालेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमोपचारानंतर त्याला नाशिक येथे हलविण्यात आले आहे. शिंदे याच्यासह अन्य दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेचे वृत्त कळताच संपूर्ण शासकीय यंत्रणा हादरून गेली. वरिष्ठ पोलीस व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी फौजफाटय़ासह घटनास्थळी धाव घेतली. पाठोपाठ जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे त्यांचे पुत्र पंकज, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदी नेतेमंडळींनी देखील तातडीने तेथे भेट दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाईचे आदेश पोलीस यंत्रणेला दिले असून प्रसंगी मोक्कांतर्गत कारवाईचा इशारा देखील दिला आहे. या घटनेनंतर लगेच नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडून सोनवणे यांच्या येथील निवासस्थानी धाव घेतली. सोनवणे येथील द्वारका परिसरात वास्तव्यास होते. या घटनेची माहिती समजल्यानंतर आ. वसंत गीते यांच्यासह विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी, शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेवून कुटुंबियांचे सांत्वन केले.

यशवंत सोनवणे यांचा परिचय
नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर हे सोनवणे यांचे मूळ गाव. तल्लख बुद्धिमत्ता आणि अविरत काम करण्याची तयारी ही यशवंत सोनवणे यांची खासियत. याच बुद्धिमत्तेच्या जोरावर १९८८ मध्ये मंत्रालय सहायक म्हणून ते प्रथम शासकीय सेवेत दाखल झाले. त्यापुढील वर्षी त्यांची लेखा विभागात वित्त अधिकारी म्हणून निवड झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर १९९० मध्ये त्यांची उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली. अवघ्या तीन वर्षांत प्रत्येक परिक्षेत त्यांनी यशाची शिखरे अक्षरश: पादाक्रांत केली. नाशिक येथे परीविक्षाधीन सेवा बजावल्यानंतर त्यांनी कळवण व मालेगाव येथे प्रांताधिकारी म्हणून काम केले. पुढे जळगावला भूसंपादन अधिकारी म्हणून काही काळ काम केल्यानंतर साधारणत: दोन वर्षांपूर्वी मालेगावच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर त्यांना बढती देण्यात आली. तेव्हापासून ते या पदावर कार्यरत होते. सोनवणे यांच्या पश्चात पत्नी विजया तसेच कुणाल व पंकज हे दोघे अनुक्रमे ११ वी आणि ९ वी इयत्तेतील मुलगे असा परिवार आहे.

सोनावणेंच्या कुटुंबियांना मदत
यशवंत सोनावणे यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबियांना सोनावणे यांच्या निवृत्तीपर्यंतचे वेतनही देण्यात येणार असून घरातील एकाला नोकरीही देण्यात येणार आहे. तसेच सोनावणे यांच्या मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्चही सरकारच्या वतीने करण्यात येणार असून त्यांना सरकारी सदनिकाही देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केले.

Link to original article - http://bit.ly/hj2hGQ

No comments:

Post a Comment