Wednesday, April 21, 2010

जोडी तुझी माझी

जोडी तुझी माझी

प्रियकर-प्रेयसी असो किंवा पती-पत्नी, कोणत्याही कपलमधलं नातं त्यांच्यातल्या खास बॉण्डिंगमधून खुलत जातं. हेल्दी रिलेशनशिप दोघांनाही उत्साही-आनंदी बनव

ते. तुम्ही जितके आनंदी असाल तितका त्याचा तुमच्या आरोग्यावर पॉझिटिव्ह परिणाम होत असतो.
.........

सोनाली आणि अमोल एक तिशीतलं छान कपल. अमोल सॉफ्टवेअर इंजिनीअर तर सोनाली एचआर पर्सन. दोघंही आपापल्या करिअरमध्ये बिझी. ऑफिसचे व्याप सांभाळून दोघंही थकून-भागून रात्रीच घरी यायचे. सकाळी उठून पुन्हा ऑफिस गाठायची घाईगडबड असायची. पण दोघांचंही नातं इतकं सुंदर होतं की जणू मेड फॉर इच अदर. सकाळी चहाचा पहिला कप अमोलकडून सोनालीच्या हातात मिळायचा. त्याचबरोबर भाजीपासून ते कांदा चिरुन देण्यापासून अनेक कामं तो करून ठेवायचा. तर त्याला आवडणारी भाजी, हटकून लागणारी स्वीट डिश ती आठवणीने त्याच्या टिफिनमध्ये ठेवायची. त्याचं बँकेतलं एखादं रुटिन काम ती न सांगता करून टाकायची. दिवसभरात कामाच्या व्यापातूनही वेळ काढून दोघं एकमेकांशी फोनवर बोलायचे. एखादा गोड एसएमएस दोघांच्याही गालावरची खळी खुलवून जायचा.

नातं, मग ते कोणतंही असो एकमेकांशी असलेल्या बॉण्डिंगमधून ते खुलत जातं. विशेषत: पती-पत्नी किंवा प्रियकर-प्रेयसी असेल तर दोघांच्या नात्यात आपसूकच एक गोडवा असतो. या नात्यातला गोडवा अधिकाधिक खुलवणं दोघांच्या हातात असतं. एकमेकांवरचा गाढ विश्वास, एकमेकांची काळजी, एकत्र असण्यातला आनंद, दोघांनी एकमेकांना दिलेला 'क्वॉलिटी टाइम' या साऱ्यातून नातं खुलतं आणि दोघंही आनंदी राहतात. जेव्हा मन आनंदी असतं तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. सुदृढ नाती आरोग्याच्या दृष्टीने केव्हाही उपयुक्त ठरतात. याबाबत सांगताना डॉ. सतीश नाईक म्हणतात की, विशिष्ट वयानंतर प्रत्येकाच्या शरीरात स्ट्रेस हामोर्न्स तयार होत असतात. मानसिक ताणतणाव अधिक असतील तर त्यांची निमिर्ती अधिक होते. पण रोजच्या आयुष्यातला तणाव कमी असला तर स्ट्रेस हामोर्न्स फारसे तयार होत नाहीत. त्यामुळे ब्लड प्रेशर, डायबीटिस यासारखे आजार होण्याची शक्यता कमी होते. नियमित झोप होत असल्याने शरीराला पुरेशी विश्रांती मिळते. अशा कपलमधलं सेक्सचं रिलेशन चांगलं असतं. महत्त्वाचं म्हणजे यातून समाधानी राहण्याचा आनंद मिळतो. एकमेकांवर खूप प्रेम करणारी, एकमेकांना सांभाळून घेणारी कपल म्हणजे हामोर्नियस कपल. एकमेकांचा सपोर्ट चांगला मिळत असल्याने मानसिक तणाव राहत नाहीत. ताणतणाव जितके कमी आणि तुमच्यातलं आनंदाचं समाधानाचं वातावरण जितकं अधिक तितके तुम्ही हेल्थवाइज फिट राहता इतकं साधं-सोपं हे गणित असल्याचं ते समजावून सांगतात.

मॅरिड कपलमध्ये हेल्दी नातं असण्याचा चांगला परिणाम मुलांवरही होतो. आपल्या आई-वडिलांमधलं खेळीमेळीचं, सुदृढ नातं, त्यांच्या नात्यातला गोडवा मुलं सतत जवळून पाहत असतात. त्यातून त्यांच्यावरही सकारात्मक परिणाम होतो. मुलं मानसिकदृष्ट्या स्टेबल राहिल्याने त्यांचा विकास चांगल्या तऱ्हेने होतो.

प्रत्येकाच्या आयुष्यात अनेकदा आजार, दुखणं -खुपणं येत असतं. एखाद्या गंभीर आजारात जीवनसाथीकडून मिळणारा मानसिक आधार महत्त्वाचा ठरतो. आजारपणात साथीदाराकडून प्रेमाने घेतली जाणारी काळजी मनाला उभारी देते आणि त्यातून लवकर रिकव्हरी होते. दोघांमधल्या हेल्दी रिलेशन्समुळे घडून येणारे हे पॉझिटिव्ह परिणाम.
............

तुमच्या दोघांमधलं नातं हेल्दी ठेवण्यासाठी या काही टिप्स :

* कम्युनिकेशन : दोघांमध्ये सुसंवाद होतो की नाही, हे लक्षात घ्या. एकमेकांशी बोलून, चर्चा करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.

* शेअरिंग : एकमेकांबद्दलच्या भावना, एकमेकांचं सुखदु:ख शेअर करायला हवं. यातूनच विश्वासाचं नातं निर्माण होतं.

* प्रामाणिकपणा : दोघांचं नातं खरंच जपायचं असेल, तर खोटेपणाला थारा देऊ नका.

* आदर आणि विश्वास : एकमेकांपासून जवळ असा किंवा लांब; एकमेकांबद्दल आदरभाव आणि विश्वास ठेवायला शिका.

* वाद हाताळायला हवे : दोन भिन्न व्यक्तींमध्ये वादविवाद होतातच. आपल्यामधले वाद मतभेदांपर्यंतच शिल्लक ठेवा. त्यांना टोकांचं रूप देऊ नका.

* समजून घ्या : काही वेळा बाहेरच्या कोणत्या तरी कारणावरून तुमचा पार्टनर अपसेट असू शकतो. या गोष्टी त्याला तुम्हाला लगेच सांगायच्या नसतील. तेव्हा त्याच्या मागे लागून ती गोष्ट जाणून घेण्याचा अट्टाहास करू नका. थोडा वेळ जाऊ द्या.

* स्पेस द्या : प्रत्येकाचं स्वतंत्र, वैयक्तिक असं जग असतं. सगळ्याच गोष्टी त्याला/तिला तुम्हाला सांगायच्या नसतील किंवा त्याला/तिला आपल्या फ्रेण्ड्सबरोबर राहण्याची, त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठीही वेळ हवा असतो. ते जगही त्यांना एन्जॉय करू द्या.

* एकमेकांना वेळ द्या : आजच्या धावपळीच्या जगात एकमेकांसाठी भरपूर वेळ नसतो. त्यामुळे दोघांनी आपल्या शेड्युलनुसार ठरवून एकमेकांना वेळ द्या. या वेळेत एखादं सरप्राइज डिनर किंवा गिफ्ट देऊन त्याला/तिला खुश करता येईल.

* पॉवर ऑफ टच : प्रत्येक वेळेस शरीरसंबंधांची गरज असतेच असं नाही. एक प्रेमाचा स्पर्श, एखादा रोमॅण्टिक किस तुमच्या सर्व भावना त्याच्या/तिच्यापर्यंत पोहचवू शकतो.

* सणसमारंभ साजरे करा : तुम्हाला वेळ नसला, तरी त्याच्यासाठी, त्याच्या घरच्यांसाठी आणि पर्यायाने तुम्हाला होणाऱ्या आनंदासाठी सणसमारंभ साजरे करा किंवा इतरांकडे होणाऱ्या समारंभांना हजर रहा. आजच्या धावपळीच्या जगात ते शक्य नाही, हे मान्य. पण, तरीही जमेल तेव्हा हे करून पहा. सासरची मंडळी सुनेवर खुश होतीलच.

* लविंग नोट : कामाच्या धबडग्यात कोणी एकापासून लांब असू शकतं किंवा एकाच घरात राहूनही दोघांची दोनचार भेट होत नाही. अशा वेळी एकमेकांना मेसेज, इमेल किंवा घरी चिठ्ठी लिहून आपलं त्याच्यावर किती प्रेम आहे, या भावना व्यक्त करायला हरकत नाही.

* टीका नको : सतत एकमेकांवर किंवा त्यांच्या घरच्यांवर टीकेचा आसूड उगारायला नको.

Thanks Maharashtra Times Team