Sunday, March 21, 2010

वाईट कामांना नेहमी चांगल्या कामांनी झाकलं पाहिजे

राज्याची प्रजा राजाच्या कारभारावर नाराज होती. तिच्या मनात खूप तक्रारी होत्या. त्यामुळे एक दिवस राजाच्या विरुद्ध मोर्चा काढण्यासाठी प्रजा रस्त्यावर उतरली. ही गोष्ट प्रधानाच्या कानावर गेली.
त्याने फर्मान सोडले की, जशी गरज असेल तसे पाऊल उचला, पण कसेही करून हा मोर्चा, हा उद्धटपणा थांबवा.
मोर्चा निघाला पण लवकरच तो गोळीबार, लाठीमार करून अडवला गेला. ज्याने बरेच लोक घायाळ झाले. इकडे तिकडे पांगले गेले. मोर्चाच्या नेत्यांना अटक केली गेली. शहरात दहशत पसरली.
काही काळानंतर प्रधानाच्या हुकूमानुसार शहरात बरीच चांगली कामे होऊ लागली, धान्य स्वस्त झालं, नवीन कारखाने उघडले गेले, रस्ते बनवले गेले. हे सगळं बघून एका सभ्य माणसाने प्रधानाला विचारलं, ‘‘तुम्ही तर कमाल करत आहात, काल तुम्ही ह्य़ा शहरातील लोकांवर गोळ्या झाडून त्यांना मारून टाकत होता आणि आज त्याच शहरातील लोकांच्या सुखासाठी, प्रगतीसाठी प्रयत्न करत आहात?
हुशार प्रधानाने उत्तर दिलं, मी मांजरीकडून एक धडा शिकलोय, तिने जर एखाद्या चांगल्या जागेवर घाण केली तर त्यावर ती लगेचच माती पसरून देते.
वाईट कामांना नेहमी चांगल्या कामांनी झाकलं पाहिजे. कारण निवडणुका येईपर्यंत लोक आम्ही केलेले वाईट काम विसरून जातील आणि आमची चांगली कामंच लक्षात ठेवतील.

Sunday, March 7, 2010

अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी विरोधकांकडून लेखी सूचना मागवा, म्हणजे त्यांना निव्वळ विरोधकाच्या भूमिकेतून बाहेर पडावे लागेल!

अर्थसंकल्प सादर होत असताना विरोधी बाकावरील काही मंडळी निषेध म्हणून उठून गेली. त्यामुळं बादशहा  अस्वस्थ झाला. अर्थमंत्री एवढा विचार करून, मेहनत करून अर्थसंकल्प तयार करतात, त्यावर विचार करून त्यातील त्रुटी दाखवून द्याव्यात, काही सूचना कराव्यात हे सर्व सोडून विरोधी गटानं अर्थसंकल्प न ऐकताच पळ काढावा हे बादशहाला रुचलं नाही आणि पटलंही नाही. या सर्व प्रकारामुळं अर्थमंत्रीही नाराज झालेले दिसत होते. बादशहानं त्यांना आपल्या नजरेनंच दिलासा दिला आणि अर्थसंकल्पाचं वाचन पुढे सुरू ठेवण्यास सांगितलं.
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारल्या तेव्हा सत्ताधाऱ्यांनी तो उत्तम आहे असं सांगितलं तर विरोधकांनी त्यातील दरवाढीचा निषेध केला. काही गट जे बादशहासोबत सत्तेत भागीदार होते त्यांच्या प्रदेशात निवडणुका होऊ घातल्या होत्या त्यांनीही भाववाढीला विरोध केला.
त्याच रात्री बादशहानं बिरबलाला विचारमंथनासाठी बोलावलं. बादशहाची नाराजी बिरबलाच्या नजरेनं टिपली होती; त्यामुळं त्याला अंदाज आला होता. बिरबल आल्यावर थोडावेळ राज्याच्या दैनंदिन कामांची चर्चा झाली आणि मग बादशहानं आपल्या मनातली खदखद व्यक्त केली. ती ऐकून बिरबल हसला आणि म्हणाला, ‘हा त्या विरोधकांचा दोष नव्हे, आपल्या संसदीय संकल्पनांचा दोष होय.’ बादशहाला त्याचा अर्थ कळला नाही तेव्हा बिरबल अधिक स्पष्ट करत म्हणाला, ‘खाविंद आपण लोकप्रतिनिधींची विभागणी ‘सत्ताधारी आणि विरोधक’ अशी करतो. एकदा विरोधक म्हटलं की त्यानं प्रत्येक गोष्टीला विरोध करणं ओघानं आलंच. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच विरोधकांची त्यावरील प्रतिक्रिया ठरलेली असते, मग तो त्यांनी ऐकला काय आणि न ऐकला काय याने काय फरक पडतो?’ बादशहा ऐकून विचारात पडला त्याची ही मन:स्थिती हेरून बिरबल पुढे म्हणाला, ‘सत्ताधारी आणि सत्तेवर नसलेले’ अशी खरं तर विभागणी व्हायला पाहिजे. ‘यावर उपाय काय?’ बादशहानं कळीचा प्रश्न विचारला. बिरबल म्हणाला, ‘आहे ना. पुढच्या वर्षी अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी विरोधकांकडून लेखी सूचना मागवा, म्हणजे त्यांना निव्वळ विरोधकाच्या भूमिकेतून बाहेर पडावे लागेल!
बिरबलाची सूचना मान्य करत बादशहानं त्याला रात्रीच्या भोजनासाठी आग्रहानं थांबवून ठेवलं. ‘मी रात्री जेवायला घरी नसेन’ हे बिरबलानं घरी आधीच सांगून ठेवलं होतं.