Sunday, February 21, 2010

ज्या व्यक्ती अतिरेकी आणि असहिष्णू भूमिका घेतात त्यांना राज्यकारभार करायचा नसतो

मंत्रिमंडळाच्या कामकाजाचा मासिक आढावा घेणारी बैठक सुरू होती. प्रत्येक मंत्री आपापला अहवाल सादर करत होता. मंत्र्यांच्या समोर द्राक्ष्याचे तजेलदार घोस चांदीच्या तबकांमध्ये ठेवलेले होते. एकूण मंत्र्यांच्या कामगिरीवर बादशहा समाधानी होता. बिरबल शांतपणे प्रत्येक मंत्र्याचा अहवाल ऐकून टिपणं काढत होता. बैठक सुरू असतानाच अचानक बाहेर गोंगाट, घोषणाबाजी, दगडफेक अशी गडबड सुरू झाली. सुरक्षा यंत्रणा लगबगीनं कामाला लागली. बादशहाने सेवकाला बाहेर काय गडबड चालली आहे ते पाहून येण्यास सांगितले. सेवक गेला आणि परत येऊन म्हणाला, ‘खाविंद, बाहेर मोठ्ठा मोर्चा आहे, ऑस्ट्रेलियन, पाकिस्तानी खेळाडूंनी आपल्या देशात खेळायला येऊ नये, त्यांना अटकाव करावा.. अशी मागणी करीत आहेत ते!’ तोवर गृहमंत्र्यांनी जाऊन बंदोबस्ताची पाहणी करून काही आदेशही दिले होते. त्यामुळे बैठक शांततेत पार पडली.
बैठक संपल्यावर बादशहा आणि बिरबल शाही भोजनासाठी एकत्र गेले. मटारच्या करंज्या, हरभरा भात असा संपूर्ण शाकाहारी बेत होता. तोंडात तुकडा ठेवताच स्वादिष्ट सुखाची भावना भरून यावी अशा त्या करंज्यांचा आस्वाद घेता घेता बादशहा म्हणाला, ‘मला एक कळत नाही, अमूक देशांच्या खेळाडूंना इथं पाय ठेवायला देऊ नका, तमूक देशाशी खेळू नका अशी अतिरेकी भूमिका ही माणसं का घेतात? अरे हा काय पोरखेळ आहे का? राजकारण वेगळं असतं आणि खेळ, कला या गोष्टी वेगळ्या असतात!’
हरभरा भाताचा घास घेत, ताकाची वाटी हाती धरत बिरबल म्हणाला, ‘खाविंद, ही माणसं अशी अतिरेकी भूमिका घेतात हे तुमचं केवढं नशीब म्हणायचं?’ हे ऐकून बादशहा आश्चर्यानं म्हणाला, ‘आता ह्यात तुला माझं नशीब कुठं दिसलं?’
जिरे-हिंगाची मस्त फोडणी घातलेल्या ताकाचा घोट घेत बिरबल म्हणाला, ‘खाविंद,  ज्या व्यक्ती अतिरेकी आणि असहिष्णू भूमिका घेतात त्यांना राज्यकारभार करायचा नसतो. अशी माणसं सत्तेत येऊ नयेत याची काळजी लोकच घेत असतात. आणि खरं सांगायचं तर अशा मानसिकतेच्या व्यक्तींना सत्तेची जबाबदारी नकोच असते. त्यांना दहशतीचं एक समांतर साम्राज्य फक्त उभं करायचं असतं.. आणि अशी दहशत टिकविण्यासाठी ते देशभक्तीच्या भडक व्याख्या करीत अतिरेकी भूमिका घेत राहतात..!’
बादशहा खाता खाता थांबून विस्मयानं सगळं ऐकत होता. बिरबलाचं तर्कशुद्ध विश्लेषण ऐकून त्याचा चेहरा खुलून आला व तो बिरबलाला म्हणाला, ‘म्हणजे फार काळजी करण्याची गरज नाही!’ करंजीचा शेवटचा घास घेत बिरबल म्हणाला, ‘काळजी करण्याची गरज नाही, पण काळजी घेतली पाहिजेच!’ ‘सुभानअल्लाह क्या बात कही बिरबल’ असं म्हणत बादशहानं आपल्या हातानं आणखी दोन करंज्या बिरबलाच्या ताटात घातल्या!

Sunday, February 7, 2010

भावनांचं राजकारण हे अंमली पदार्थाच्या सेवनासारखं असतं

‘जो या राज्यात जन्मला तोच या राज्याचा, बाकी सर्व उपरे!’ एका तरुण नेत्यानं जोरदार गर्जना केली. लाखो हातांनी टाळ्यांचा कडकडाट केला. समूहाच्या मनात जणू ‘आपण कुणीतरी खास आहोत’ अशी रोमांचक भावना निर्माण झाली. या भावनेचे पडसाद राज्यभर उमटू लागले. बादशहाकडे या बातम्या पोहोचत होत्या व हळूहळू त्याची अस्वस्थता वाढत होती. ‘सलग १५ वर्षे ज्याचे वास्तव्य या राज्यात आहे तो अधिकृत’ असं एकेकाळी म्हटलं जात होतं. परंतु अलिकडे ‘आपला आणि उपरा’ यांच्या व्याख्या बदलल्या, स्वरूपही बदलले होते. त्यामुळं सलोख्याला सुरूंग लागला होता. काहीतरी करायला हवं, असं बादशहाला वाटू लागलं आणि त्यानं बिरबलाला बोलावणं पाठवले. ‘सगळं काही आलबेल आहे, बादशहानं कशाला बरं बोलावलं असेल’ असा विचार करीत बिरबल बादशहाकडे पोचला. ‘खाविंद, आपण याद केलीत माझी?’
बादशहा म्हणाला, ‘मला फार काळजी वाटते आहे, राजधानीतलं वातावरण गढुळलं आहे, मनामनात अदृश्य भिंती उभ्या राहत आहेत.’
बिरबल म्हणाला, ‘खाविंदांनी निश्चिंत असावं, जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे!’
बादशहाला बिरबलाचं उत्तर ऐकून आश्चर्य वाटलं. ‘अरे, जो या राज्यात जन्मला तोच इथला, अशी अतिरेकी घोषणा देण्यापर्यंत मजल गेली आहे, आणि तू म्हणतोस मी निश्चिंत असावं!’
बिरबल हसला आणि म्हणाला, ‘खाविंद, भावनांचं राजकारण हे अंमली पदार्थाच्या सेवनासारखं असतं. त्याचा डोस सतत वाढवत राहावा लागतो. आणि एक वेळ अशी येते की, डोस कितीही वाढवला तरी त्याची किक बसत नाही. म्हणूनच म्हटलं, डोस वाढवला जातोय म्हणजे अगदी योग्य दिशेनं चाललं आहे राजकारण!
बिरबलाचा हा तर्क ऐकून बादशहा गोंधळला. जरा अविश्वासानंच म्हणाला, ‘पण खरंच असं होईल?किक बसणार नाही,अशी वेळ येईल? बिरबल शांत स्वरात म्हणाला, ‘खाविंद या नेत्याच्या पूर्वसूरींना अखेर अंमली पदार्थाचा ब्रँड बदलून राजकारण करण्याची वेळ आली होती हे विसरू नका!’ आणि मग बादशहा निर्धास्त झाला व म्हणाला, ‘चहा नामक मादक पेय चालेल का तुला आत्ता?’ अर्थात बिरबलाने ते आमंत्रण आनंदाने स्वीकारलं!

Monday, February 1, 2010

काही प्रसंग असे असतात, ते साजरे करावेच लागतात, त्यातून जगण्याची उभारी मिळते, संघर्षांला बळ प्राप्त होते

दिवाळीच्या सुमारास बादशाह आणि बिरबल रात्रीच्या वेळी राजधानीचा एक फेरफटका मारण्यास निघाले. सगळीकडे प्रकाशाचं साम्राज्य पसरलेलं होतं. रंगीबेरंगी दिव्यांनी आकाश व्यापलं होतं. दारादारात तेला-तूपाचे दिवे लागलेले होते. महागडय़ा वस्त्रांची दुकानं गर्दीनं तुडुंब भरलेली होती. जिथं-तिथं ‘डिस्काऊंट सेल’ लागलेले होते आणि तिथं अधिकच गर्दी होती. सुगंधी फवारे, सुगंधी तेले, उटणे यामुळं आसमंत सुगंधाच्या विविधतेत न्हाला होता. फराळाच्या पदार्थाची दुकानं पिशव्या भरभरून पदार्थ विकत होती. शिवाय घराघरात तळणी-भाजणी सुरू होतीच. मूलं-माणसं फटाक्यांचा, शोभेच्या दारूचा आनंद लुटत होती. हे सर्व पाहता पाहता बादशाह अचानक थबकला आणि बिरबलाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, ‘‘एकूण मला तुम्ही जे काही रिपोर्ट्स देता ते सगळे खोटे आणि फसवे असतात तर!’’ बिरबल म्हणाला, ‘‘ तुम्हाला काय म्हणायचे आहे खाविंद?’’ बादशहा घुश्शातच म्हणाला, ‘‘महागाई, मंदी, नोकरकपात, दुष्काळ, नापिकी, भ्रष्टाचार यामुळं जनता त्रस्त आहे असं तू मला नेहमी सांगत असतोस.. आणि प्रत्यक्षात तर जनता आनंदी दिसते आहे. केवढा उत्साह आहे दिवाळीचा? कुठं आहे तुझी ती महागाई? कुठं आहे मंदी?’’ बिरबल काहीच बोलला नाही, कारण बादशहाचा पारा खूपच चढलेला होता. बादशहाला जरा वेळानं बिरबलानं निरोपाचा कुर्निसात केला तेव्हाही तो रागातच होता. आठवडाभरानं बिरबल पुन्हा बादशहाच्यासमोर बसलेला होता. बादशहाच्या सत्ता स्थापनेचा वर्धापनदिन धुमधडाक्यात साजरा करायचा होता त्याविषयी विचार करण्यासाठी ही बैठक होती. बैठक सुरू झाली आणि मोठय़ा बेगमची दासी धावत आली. म्हणाली, ‘‘बेगमच्या अब्बाजानची तब्येत खूपच खालावली आहे.’’ ते ऐकून बिरबल म्हणाला, ‘‘खाविंद, अशा स्थितीत आपण सत्ता स्थापनेचा वर्धापनदिन करू नये!’’ त्यावर बादशहा म्हणाला, ‘‘बिरबल, काही प्रसंग असे असतात, ते साजरे करावेच लागतात, त्यातून जगण्याची उभारी मिळते, संघर्षांला बळ प्राप्त होते.’’ हे ऐकून बिरबल हसला आणि म्हणाला, ‘‘लोक दिवाळी साजरी करताना, असाच विचार करतात खाविंद!’’ बादशहा चमकचा आणि दासीकडे पाहून म्हणाला, ‘‘अगं मोठय़ा बेगमच्या अब्बाजानच्या इंतकाल (निधन) तर गेल्यावर्षीच झाला ना?’’ आणि मग बिरबलाकडे पाहत म्हणाला, ‘‘आम्हाला धडा शिकवलात ना, चला आता वर्धापनदिनाची तयारी करू या!

एनी पब्लिसिटी इज ए गूड पब्लिसिटी

गेले काही दिवस राज्यात मोठाच गदारोळ सुरू झाला होता. वृत्तपत्रे, वाहिन्यांवर एक चर्चा सुरू होती. अमूक चित्रपटातील दृश्यांवर एका नेत्याने कात्री चालवणे भाग पाडले. मग त्या चित्रपटाचे खास खेळ रोज वेगवेगळ्या नेत्यांसाठी होऊ लागले. कधी त्या नेत्याचा एखाद्या संवादावर आक्षेप असे तर कधी त्या नेत्याचे भक्त दुखावत. मग त्यांच्या मर्जीप्रमाणे चित्रपटात बदल करत असल्याची घोषणा केली जात असे. नेते आणि त्यांचे भक्त सदैव तोडफोडीची भाषा करत प्रसंगी तोडफोड करीतही होते.
मग एका चित्रपटाच्या शिर्षकावर कोणाची तरी खप्पामर्जी झाली. पुन्हा धमकावण्याची भाषा, ‘अमूक करू, तमूक करू’ची भाषा. निर्मात्याची धावाधाव आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची हाती पेन धरून किंवा माईक धरून धावपळ.हे सगळं पाहून बादशहा जाम वैतागला. ‘चित्रपटात काय दाखवणं योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे ठरविण्यासाठी एक समिती आहे ना नेमलेली, मग हे सगळं कशासाठी?’ असं बादशहा करवादून म्हणाला. बिरबलानं मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक यांची अवस्था, नेत्यांची उद्दाम भाषा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची नव्यानं होत असलेली चर्चा यामुळं बादशहा सतत त्याच गोष्टींचा विचार करत होता.
अखेर बादशहानं बिरबलाला विचारलं, ‘यावर आपण काही तरी करावं, या हस्तक्षेपाला पायबंद घालावा, असं तुला नाही का वाटतं?’
बिरबल म्हणाला, ‘खाविंद, आज घडीला जेवढय़ा चित्रपटांची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे त्यातील दहा चित्रपटांची नावं काढूया.’ तशी काढण्यात आली. मग बिरबल म्हणाला, ‘आता आपले गुप्तहेर या दहा निर्मात्यांच्या, दिग्दर्शकांच्या घरी पाठवा आणि अहवाल मागवा.’ बादशहाने बिरबलाची ती सूचनाही अंमलात आणण्याचे फर्मान सोडले. अहवाल आल्यावर बिरबलाने गुप्तहेर खात्याच्या प्रमुखाला विचारले, ‘आपला निष्कर्ष सांगा.’ बादशहाला कुर्निसात करून गुप्तहेर प्रमुख म्हणाला, ‘जहांपनाह, हे सर्वच्या सर्व दहा निर्माते रोज देवाला प्रार्थना करीत आहेत, देवा, आमच्या चित्रपटाबद्दलही काही तरी वाद होऊ देत!’
बादशहाला आश्चर्य वाटलं. बिरबल म्हणाला, ‘एनी पब्लिसिटी इज ए गूड पब्लिसिटी, हे आजचं घोषवाक्य आहे खाविंद. अशी प्रसिद्धी झाली की लोक चित्रपटाला हमखास गर्दी करतात. त्यामुळं हे प्रकार अनेकदा संगनमतानं होतात. कधी कधी ते खरेही असतात.’
बादशहा आश्चर्यानं म्हणाला, ‘अल्लाह, हे असे आहे तर! मग लोकशिक्षणाची खरी गरज आहे.’
बिरबल हसत हसत म्हणाला, ‘खाविंद, लोकशिक्षण हे आयुर्वेदासारखं आहे, एक तर त्याचा प्रभाव जाणवायला काळ जावा लागतो आणि दुसरं म्हणजे, त्याची मात्रा  प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार वेगवेगळी द्यावी लागते!’
आयुर्वेदाची उपमा बादशहाला बेफाम आवडली. तो हसत हसत बिरबलाला म्हणाला, ‘चल, काढा घेऊ या!