मंत्रिमंडळाच्या कामकाजाचा मासिक आढावा घेणारी बैठक सुरू होती. प्रत्येक मंत्री आपापला अहवाल सादर करत होता. मंत्र्यांच्या समोर द्राक्ष्याचे तजेलदार घोस चांदीच्या तबकांमध्ये ठेवलेले होते. एकूण मंत्र्यांच्या कामगिरीवर बादशहा समाधानी होता. बिरबल शांतपणे प्रत्येक मंत्र्याचा अहवाल ऐकून टिपणं काढत होता. बैठक सुरू असतानाच अचानक बाहेर गोंगाट, घोषणाबाजी, दगडफेक अशी गडबड सुरू झाली. सुरक्षा यंत्रणा लगबगीनं कामाला लागली. बादशहाने सेवकाला बाहेर काय गडबड चालली आहे ते पाहून येण्यास सांगितले. सेवक गेला आणि परत येऊन म्हणाला, ‘खाविंद, बाहेर मोठ्ठा मोर्चा आहे, ऑस्ट्रेलियन, पाकिस्तानी खेळाडूंनी आपल्या देशात खेळायला येऊ नये, त्यांना अटकाव करावा.. अशी मागणी करीत आहेत ते!’ तोवर गृहमंत्र्यांनी जाऊन बंदोबस्ताची पाहणी करून काही आदेशही दिले होते. त्यामुळे बैठक शांततेत पार पडली.
बैठक संपल्यावर बादशहा आणि बिरबल शाही भोजनासाठी एकत्र गेले. मटारच्या करंज्या, हरभरा भात असा संपूर्ण शाकाहारी बेत होता. तोंडात तुकडा ठेवताच स्वादिष्ट सुखाची भावना भरून यावी अशा त्या करंज्यांचा आस्वाद घेता घेता बादशहा म्हणाला, ‘मला एक कळत नाही, अमूक देशांच्या खेळाडूंना इथं पाय ठेवायला देऊ नका, तमूक देशाशी खेळू नका अशी अतिरेकी भूमिका ही माणसं का घेतात? अरे हा काय पोरखेळ आहे का? राजकारण वेगळं असतं आणि खेळ, कला या गोष्टी वेगळ्या असतात!’
हरभरा भाताचा घास घेत, ताकाची वाटी हाती धरत बिरबल म्हणाला, ‘खाविंद, ही माणसं अशी अतिरेकी भूमिका घेतात हे तुमचं केवढं नशीब म्हणायचं?’ हे ऐकून बादशहा आश्चर्यानं म्हणाला, ‘आता ह्यात तुला माझं नशीब कुठं दिसलं?’
जिरे-हिंगाची मस्त फोडणी घातलेल्या ताकाचा घोट घेत बिरबल म्हणाला, ‘खाविंद, ज्या व्यक्ती अतिरेकी आणि असहिष्णू भूमिका घेतात त्यांना राज्यकारभार करायचा नसतो. अशी माणसं सत्तेत येऊ नयेत याची काळजी लोकच घेत असतात. आणि खरं सांगायचं तर अशा मानसिकतेच्या व्यक्तींना सत्तेची जबाबदारी नकोच असते. त्यांना दहशतीचं एक समांतर साम्राज्य फक्त उभं करायचं असतं.. आणि अशी दहशत टिकविण्यासाठी ते देशभक्तीच्या भडक व्याख्या करीत अतिरेकी भूमिका घेत राहतात..!’
बादशहा खाता खाता थांबून विस्मयानं सगळं ऐकत होता. बिरबलाचं तर्कशुद्ध विश्लेषण ऐकून त्याचा चेहरा खुलून आला व तो बिरबलाला म्हणाला, ‘म्हणजे फार काळजी करण्याची गरज नाही!’ करंजीचा शेवटचा घास घेत बिरबल म्हणाला, ‘काळजी करण्याची गरज नाही, पण काळजी घेतली पाहिजेच!’ ‘सुभानअल्लाह क्या बात कही बिरबल’ असं म्हणत बादशहानं आपल्या हातानं आणखी दोन करंज्या बिरबलाच्या ताटात घातल्या!
No comments:
Post a Comment