मराठी पेपर मधून काही निवडक लेखाची कात्रणे तुमच्यासाठी - All क्रेडीट goes to respective writer
Saturday, January 15, 2011
आयपीएल : निष्ठा, प्रतिष्ठा की पैसा ?
आयपीएल : निष्ठा, प्रतिष्ठा की पैसा ?
निरनिराळ्या आयपीएल संघांकरिता खेळाडूंच्या खरेदीसाठी नुकताच जाहीर लिलाव करण्यात आला. या लिलावात अनेक नवोदित खेळाडूंवर कोटी-कोटींची बोली लावण्यात आली. ही खरेदी नेमकी कोणत्या निकषांवर होते, हे अजून अज्ञात आहे. हे असेच चालले तर एके दिवशी आयसीसी आणि भारतीय क्रिकेट बोर्डालाही डावलून हा खेळ संघमालक आपल्या खिशात घालतील, अशी लक्षणे आहेत. त्यामुळेच आयपीएलसंदर्भात सर्वसामान्यांच्या मनात अनेकानेक प्रश्न उपस्थित होत आहेत.. ‘आयपीएल ४’चा लिलाव ललित मोदींशिवाय संपला. ललित मोदी कार्यरत असताना मिळालेल्या प्रतिसादापेक्षाही मोठा प्रतिसाद यावेळी मिळाला. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, वीरेंद्र सेहवाग यांना मिळालेल्या रकमेपेक्षाही अधिक रक्कम गंभीर, युसूफ पठाण, रॉबिन उत्थप्पा, रोहित शर्मा, इरफान पठाण, युवराजसिंग, एवढेच नव्हे तर रणजी सामन्यातही आपला ठसा न उमटविणाऱ्या सौरभ तिवारीला मिळाली. गुरंढोरं विक्रीच्या बाजाराप्रमाणे क्रिकेट-विक्रीच्या या बाजाराच्या थेट प्रक्षेपणाचेही यावेळी मार्केटिंग झाले. आयपीएल हे आता केवळ क्रिकेट उरलेले नाही. आयपीएल हा मोठा उद्योगधंदा बनला आहे. २०११ च्या या लिलावाचे स्वरूप पाहिले तर उद्योगाच्याही पलीकडे हे क्रिकेट चालले आहे, याची जाणीव होते. ती एक प्रवृत्ती बनत चालली आहे. उद्योगजगतातल्या अंबानी, मल्ल्या, वाडिया, सहारा यांच्यासारखे दादा लोक आयपीएल क्रिकेट बोर्डाच्या दावणीतून कधी सुटका होऊन ते मोकाट सुटतील, हे यापुढे कुणालाही सांगता येणार नाही.
उद्योगपतींच्या मुजोर प्रवृत्तीचे दर्शन आयपीएलने अधूनमधून घडविले आहेच. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावा, सर्वोच्च शतके झळकविणारा सचिन तेंडुलकर मोठा की काल-परवा आलेले, कसोटी क्रिकेटचा टिळाही न लागलेले रोहित शर्मा, सौरभ तिवारी हे मोठे, हे यापुढे मल्ल्या, अंबानी, सहारा, प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी, गायत्री राव हीच मंडळी ठरवणार आहेत. गौतम गंभीरची लिलावातील किंमत ११.४ कोटी रुपये कशाच्या आधारे ठरविण्यात आली, याचे उत्तर सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडचे आहे. रॉबिन उत्थप्पा गेले कित्येक महिने भारतीय संघात समाविष्ट होऊ शकलेला नाही. पण त्याला लिलावात आलेला भाव आहे- ९.६६ कोटी एवढा प्रचंड. सौरभ तिवारी, इरफान पठाण यांनी तर यंदा रणजी स्पर्धाही गाजविल्या नाहीत, पण त्यांच्या खिशातही आठ व सहा कोटींपेक्षा अधिक पैसे पडले आहेत. इरफान पठाण तर वर्षभर बडोदे क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावरदेखील फिरकला नाही. कारण तो क्रिकेट खेळण्याइतपत तंदुरुस्तच नाही. सध्या तो बंगळुरूमध्ये फिटनेससाठी धडपडतोय. पण अशा खेळाडूसाठीही आठ कोटी ८७ लाखांपर्यंतची बोली लागली.
सारेच अनाकलनीय आहे! शेअर मार्केटवर नियंत्रण करणारी आणि ते हलविण्याची क्षमता असलेली ही मंडळी क्रिकेट कोणत्या थराला घेऊन जाणार आहेत, याचीच ही झलक आहे. आयपीएल ही उद्योजकांना सापडलेली पैसे कमावण्याची खाण आहे. या खाणीतून पैसा काढताना क्रिकेटची नीतीमूल्ये पायदळी तुडवण्यास सुरुवात झाली आहे. ललित मोदींच्या पश्चातदेखील या स्पर्धेला प्रचंड पुरस्कर्ते लाभले आहेत. प्रचंड पैसा तीत आला आहे. प्रेक्षकांचा पाठिंबाही प्रचंड आहे. अशा परिस्थितीत कसोटी क्रिकेट, एकदिवसीय क्रिकेट, एवढेच नव्हे तर आयसीसीच्या स्वत:च्या असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धा, ट्वेन्टी-२० वर्ल्ड कप आदी स्पर्धानादेखील आयपीएल यापुढे झाकोळून टाकू शकेल, अशी शक्यता आतापासूनच दिसायला लागली आहे.
हे आयपीएल आयसीसीच्या अस्तित्वालाच उद्या आव्हान देऊ शकेल. कारण त्यांना कुणाचीही बंधने नको आहेत. स्वत:चा स्वतंत्र कार्यक्रम त्यांना राबवायचा आहे. भारतीय संघ नसला तरीही ‘ट्वेन्टी-२०’ क्रिकेटला प्रेक्षक मोठय़ा प्रमाणावर येतात, हे फ्रॅन्चायझींच्या मालकांना कळून चुकले आहे. त्यामुळेच हा आगामी धोका ओळखून भारतीय क्रिकेट बोर्डाने संघमालकांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे. खेळाडूंचे गेल्या दोन वर्षांचे मानधन न देणाऱ्या पंजाब संघाचा नफ्यातील सर्व हिस्सा क्रिकेट बोर्डाने अडकवून ठेवला होता. असे नाक दाबल्यामुळेच त्या संघाचे तोंड उघडले. युवराजसिंग, इरफान पठाण, कुमार संगकारा आदी खेळाडूंना थकित मानधन मिळाले.
ललित मोदी यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या काही फ्रॅन्चायझींनाही क्रिकेट बोर्डाने मागे सरळ केले होते. पण तांत्रिक बाबींपुरतीच ही लढाई मर्यादित होती. आयपीएल किंवा ट्वेन्टी-२० मुळे होणारे क्रिकेटचे नुकसान आयसीसी किंवा भारतीय क्रिकेट बोर्डालाही आता रोखता येणार नाही. कारण प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी यापुढे क्रिकेटचे अधिकाधिक विकृत स्वरूपात विडंबन केले जाण्याची शक्यता आहे. ललित मोदी यांनी ‘चीअरगर्ल्स’च्या नावाखाली आंबटशौकिनांची अपेक्षा वाढविली आहेच. फलंदाजाने मारलेल्या चौकार-षटकारापेक्षाही त्यानंतर नाचणाऱ्या या क्रिकेट-बालांचे तोकडय़ा कपडय़ांमधील नृत्य पाहण्यासाठीचा उत्साहच अधिक असते. प्रत्येक वेळी आयपीएल अशा नवनव्या कल्पना घेऊन अवतरणार आहे. दोन डावांच्या मधील वेळेचा बॉलीवूड स्टार्सच्या नृत्यांसाठी वापर करण्याचीही कल्पना आहे. गुलामांप्रमाणे बोली लावून विकत घेतलेल्या या क्रिकेटपटूंना वागणूकही तशीच देण्यात येत आहे. साडेतीन तास संघर्षमय क्रिकेट खेळून थकल्या-भागल्या खेळाडूंना मध्यरात्रीच्या पार्टीला हजेरी लावणे सक्तीचे आहे. मागे एकदा भारताच्या दोन माजी कप्तानांनी थट्टेने म्हटले होते की, ‘सामना पाहतानाही काही महागडय़ा स्टॅण्ड्समध्ये आम्हाला व राखीव खेळाडूंना बसविण्याची आग्रही विनंती होती. हे मालक लोक आणखी जास्त पैसे मिळतात म्हणून आमच्या मांडीवर बसून सामना दाखविण्याची शक्कलही लढवू शकतील.’ यातील अतिशयोक्तीचा आणि विनोदाचा भाग सोडला, तरीही भारताचे दोन माजी कप्तान आपल्या संघमालकांची मजल कुठवर जाऊ शकते, याबद्दल काय विचार करतात, हेच यातून स्पष्ट होते.
आयपीएलमधील आणखी एका गोष्टीचे आश्चर्य वाटते. ते म्हणजे- खेळाडूंची किंमत ठरविण्याची पद्धत! ती कोण ठरवतो, तेही गुलदस्त्यातच आहे. तीन वर्षांपूर्वीच्या लिलावामध्ये बहुतांशी खेळाडूंना विकत घेताना संघमालक व त्यांचे भागीदार यांचाच प्रभाव जास्त जाणवत होता. त्यांनी मोठमोठी नावे असलेले खेळाडू घेण्यासाठी उडय़ा टाकल्या होत्या. तीन वर्षांनंतर हे मालक शहाणे झालेले दिसताहेत. यावेळी मोठय़ा खेळाडूंच्या मागे न धावता त्यांनी खेळाडूंच्या उपयुक्ततेचादेखील विचार केलेला दिसत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे यावेळी त्यांनी आपल्या ताफ्यातील क्रिकेट जाणकारांचा सल्ला विचारात घेतला आहे. प्रत्येक संघाकडे कर्मचारीवर्गही मोठा आहे. पडद्याआडचे हे कलाकार आपल्याला दिसत नाहीत. पण आयपीएल फ्रॅन्चायझी एखाद्या कंपनीप्रमाणे संघाचा स्वतंत्र कारभार पाहतात. प्रमुख प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक, गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षण यासाठी वेगवेगळे मार्गदर्शक, खेळाडूंचा फिझिओ वेगळा, ट्रेनर वेगळा, मॅनेजर वेगळा, ग्राऊंड स्टाफ वेगळा. प्रत्येक संघाचा सीईओ असतो. तो क्रिकेट मैदानावरची आणि मैदानाबाहेरची व्यवस्थाही पाहत असतो. त्याला वेगवेगळ्या विभागांची कामे करण्यासाठी सहाय्यक असतात. स्टेडियमवरील व्यवस्था पाहणे, आपल्या संघाची नेटस् लावणे, सरावाची व्यवस्था पाहणे, खेळपट्टी कशी असावी आणि त्यानुसार ती करून घेणे, याकडेही त्याला लक्ष द्यावे लागते. त्यासाठी क्युरेटरची स्वतंत्रपणे नेमणूक करण्यात येते. दुसरा विभाग स्टेडियमवरील जाहिरातींकडे लक्ष पुरवीत असतो. त्या जाहिराती, पुरस्कर्ते आणणारे लोक वेगळे असतात. एक विभाग तिकीट विक्री, तिकिटांचे दर ठरवणे, ती छापून घेणे, पुरस्कर्ते व सर्वसंबंधितांपर्यंत पोहोचविणे हे काम पाहत असतो. प्रत्येकाचे पुरस्कर्ते वेगवेगळे असतात. त्यांना जपणारा विभाग वेगळा असतो. प्रत्येक संघाला आपल्या संघातील दिग्गज खेळाडूंचे मार्केटिंगही करायचे असते. त्यासाठी जाहिरातदार मिळविणे, स्वत:च्या ब्रॅण्डच्या जाहिराती करणे, यावर त्यांना काम करावे लागते. एक विभाग असा असतो की, जो सामन्याच्या पाश्र्वभूमीवर आणखी पैसे कसे कमावता येतील, याची योजना आखत असतो. अंतिम सामन्यानंतर किंवा प्रत्येक सामन्यानंतरची मेजवानी हा त्याचाच एक भाग आहे. धनाढय़ क्रिकेटशौकिन अशा डिनर पाटर्य़ावर लाखो रुपये उडवतात. त्या पाटर्य़ाना आकर्षित करण्याचे काम एक विभाग करीत असतो. आवडत्या खेळाडूसोबत डिनर घ्यायला मिळणे, या आनंदासाठी लाखो रुपये मोजणारे एकीकडे असतात; तर दुसरीकडे नाइलाजाने, बळेबळे या डिनर पार्टीला हजेरी लावणारे खेळाडू असतात. मागे अनेकांनी अशा पाटर्य़ाना जाणे टाळले होते आणि आपल्या संघमालकांचा रोष पत्करला होता.
सुमारे दीड महिना चालणाऱ्या या आयपीएल उद्योगामागे प्रत्येक संघाचा सुमारे १०० ते ३०० जणांचा कर्मचारीवर्ग राबत असतो.
आयपीएल गेट मनी हादेखील खेळाडूंच्या लिलावातील किमतीप्रमाणेच न कळणारा प्रकार आहे. कारण सर्वसामान्य प्रेक्षकांना ही तिकिटे मिळत नाहीत. स्टेडियमवर तिकिटे विकली जात नाहीत. पुरस्कर्ते आणि कॉर्पोरेट मित्रांमार्फतच या तिकिटांचे वाटप, वितरण होत असते. त्यामुळे तेथे पहुंॅच असणाऱ्यांनाच तिकिटे मिळतात. आणि टंचाई भासली की मागणी वाढते, या न्यायाने तिकिटांच्या किमती वाढत जातात. कधी कधी तिकिटे संपल्याचे सांगण्यात येते, परंतु स्टेडियममधील स्टॅण्ड्स रिकामेच असतात. आयपीएलचा आभास हा असा आहे!
सचिन तेंडुलकरची किंमत त्याने निवडलेल्या खेळाडूंपेक्षा कमी असू शकते का? जॅक कॅलिस, ग्रॅमी स्मिथ, केव्हिन पीटरसन यांच्या किमती रणजी खेळाडूंपेक्षा कमी असू शकतात, हा विचारदेखील पटत नाही. खेळाडूंना मिळणारी रक्कम त्यांच्या खेळाच्या दर्जाच्या योग्यतेनुसार आहे, त्यांच्या प्रतिभेला अनुसरून आहे, की संघमालकांच्या चाणक्यांनी ठरविलेल्या निकषानुसार आहे? आयपीएलच्या अनपेक्षित यशाप्रमाणेच या प्रश्नांची उत्तरेदेखील अज्ञातच आहेत.
आता अन्य खेळाडूंना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. ३० लाख वार्षिक किंमत निश्चित केलेल्या अंबाती रायडूला त्यापेक्षा तिप्पट पैसे देऊन घेण्याची तयारी मुंबई इंडियन्सने दाखविली होती. आता मुंबईकडून आठ आकडी पैसे मोजून त्याला घेण्यासाठी बंगळुरू संघ पुढे सरसावला आहे. अशाने खेळाडूंची निष्ठा नेमकी कुठे राहील? पैशाप्रती की त्याच्या राज्याच्या संघाप्रती? कारण मुंबईसह कुणीही आपापल्या खेळाडूंना मोठय़ा प्रमाणावर घेण्यात रस दाखवलेला नाही. अगदी आपल्या तेंडुलकरनेदेखील!
Link to original Article
http://bit.ly/dEKxCN
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment