Monday, September 12, 2011

‘धन जोडोनिया उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी..’ असं त्यांना कोणी सांगावं लागलं नाही.

मार्च महिना आला की हे एक नेहमीचं काम असतं.अमेरिकेत मायक्रोसॉफ्ट कंपनीत एक अगदी जवळचा मित्र-नातेवाईक मोठय़ा पदावर आहे, त्याला चांगलं काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांची नावं पाठवायची. आपल्याकडे असं काम करणाऱ्यांची खरंच काही कमी नाही. कमी असलीच तर ती असते अशा संस्थांना मदत करणाऱ्यांची. तसं आपण सामाजिक भान, बांधिलकी वगैरे बरंच काही नेहमी बोलत असतो, पण ते तेवढय़ापुरतंच. तर याला अमेरिकेत ही नावं का पाठवायची, तर त्याला तिथून अशा संस्थांना पैसे पाठवता यावेत यासाठी.
पण हे मार्च महिन्यातच का करायचं..
हाच यातला कळीचा मुद्दा आहे. आपल्या पारंपरिक नजरेतून विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर असेल, आयकर वाचवण्यासाठी असं. मार्च महिन्यात आयकराचा मोठा दणका बसतो, त्यामुळे जमेल तितका कर वाचवण्यासाठी जमेल त्या मार्गानं आपल्याला प्रयत्न करायचे असतात. काही सामाजिक संस्थांना देणगी दिली तर ती करमुक्त असते, म्हणून अनेक जण या काळात देणग्यांच्या पावत्यांची व्यवस्था करीत असतात. तेव्हा या किंवा अशाच काही कारणांसाठी अमेरिकेतल्यांनाही संस्थांची नावं लागत असावीत, असं वाटलं तर ते आपल्या एकूण प्रचलित संस्कृतीला साजेसंच म्हणायला हवं. पण ही नावं, मार्च महिन्यात पाठवायची याचं कारण हे नाही.
एप्रिल महिन्यापासून त्या कंपनीचं नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं आणि मार्च महिन्यात मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना कंपनीला लेखी द्यावं लागतं -अमुक एका संस्थेसाठी माझ्या पगारातून उदाहरणार्थ दरमहा ५० डॉलर्स कापून घ्या.
मग यात काय विशेष..
तर विशेष हे की त्या कर्मचाऱ्याच्या ५० डॉलर्सच्या वाटय़ात कंपनी आपले ५० डॉलर्स घालते आणि संस्थ्ेाच्या नावानं १०० डॉलर्सचा वाटा बाजूला काढून ठेवते. तोही त्या कर्मचाऱ्यांच्या नावानं..
बिल गेट्स मोठा का, त्याचं एक महत्त्वाचं कारण हे आहे आणि अमेरिका महासत्ता का, तर त्या देशात असे असंख्य बिल गेट्स आहेत. मायक्रोसॉफ्ट्स आपल्याला माहिती आहे म्हणून त्याचं कौतुक. पण अमेरिकेत, युरोपातल्या अनेक देशांत अशा असंख्य कंपन्या आहेत की ज्या आपल्या फायद्यातला चांगला घसघशीत वाटा चांगल्या कामासाठी देत असतात.
हे सगळं आता सांगायचं कारण असं की पुढच्या आठवडय़ात वॉरन बफे नावाचा महादाता भारत-भेटीवर येतोय. (खरं तर दाता या शब्दाला चांगला पर्याय हवा. दाता म्हटलं की त्याच्या दारात याचक उभे आहेत आणि बऱ्याच काळानं दार उघडतं आणि आतून येणारा बाहेरच्यांच्या हातावर काहीतरी टेकवतो.. ते बाहेरचे त्यामुळे हरखून जातात.. धन्य धन्य होतात.. असंच चित्रं डोळय़ांपुढे येतं. हा शब्द डोनर या इंग्रजीचा मराठी प्रतिशब्द आहे का.. इंग्रजीतला खरा शब्द आदरणीय आहे तो फिलांथ्रोपिस्ट. हा शब्द बनलाय फिलांथ्रोपोस या ग्रीक शब्दापासून. फिलास म्हणजे प्रेम आणि आंथ्रापोस म्हणजे मानवता. धर्मादाय देणग्यांपेक्षा हा प्रकार वेगळा आहे. धर्मादाय देणग्यांना धर्माचा पाया असतो किंवा धर्म हा विचार त्यामागे असतो. फिलांथ्रोपी फक्त मानवतेच्या विचारातून होते. आणि त्यामागचं उद्दिष्ट ज्याला काही द्यायचंय त्याचं दीर्घकालीन कल्याण करणं, त्याला पायावर उभा करणं.. हे असतं. असो. ) या बफे यांचं नाव अनेकांना माहीत नसेल. ते उद्योगपती वगैरे नाहीत, तर ते एक प्रचंड मोठे.. आपल्याला कल्पनाही येणार नाही इतक्या आकाराचे.. गुंतवणूकदार आहेत. बर्कशायर हाथवे नावाची त्यांची गुंतवणूक कंपनी जगभरातल्या अनेक कंपन्यांत गुंतवणूक करते. आपल्याकडेही त्यांनी काही विमा कंपन्यांत पैसा लावलाय. काही काळानं या कंपन्या फळफळल्या की बफे आपली गुंतवणूक काढून घेतात आणि गडगंज नफा कमावतात. बफे यांनी गुंतवणूक करेपर्यंत यातल्या अनेक कंपन्या अनेकांना माहीतही नसतात. किंबहुना ते अशा नाव नसलेल्या कंपन्यांनाच हात घालतात. उद्या फायद्यात येणाऱ्या कंपन्यांचा त्यांना आजच वास कसा काय येतो, हे आपल्या पीएफाधिष्ठित वृत्तीला न कळणारं कोडं आहे.
पण मुद्दा तो नाही. तर हा माणूस मिळालेला फायदा मुठीमुठीनं वाटतो. फोर्बस् या o्रीमंतांची मोजमाप करणाऱ्या आणि खोली मोजणाऱ्या मासिकानं गेल्या वर्षी दिलेल्या आकडेवारीनुसार बफे यांची संपत्ती होती ४७०० कोटी डॉलर्स इतकी. (एक डॉलर = साधारण ४६ रु.) बफे यांनीच जाहीर केलेल्या निवेदनानुसार यातील ९९ टक्के रक्कम ही देणग्यांसाठी त्यांनी ठेवली आहे. त्या निवेदनात बफे असं म्हणाले, ‘‘माझी आताची जी काही जीवनशैली, राहणीमान आहे, ते पुढील आयुष्यात कायम ठेवण्यासाठी माझ्याकडच्या संपत्तीचा एक टक्का भाग मला लागेल. उरलेला ९९ टक्के मी ठेवून काय करू, त्यामुळे माझं जगणं काही अधिक o्रीमंत होईल वा ती रक्कम मला अधिक सुखी करेल असं नाही, तेव्हा ही रक्कम द्यायलाच हवी.’’
 खरं तर भारताचीच नाही तर जगाची आर्थिक दुनिया बफे यांच्या मुठ्ठीत आजही आहे. त्यामुळे इतक्या पैशातून ते बायकोसाठी विमानं वगैरे खरेदी करू शकले असते..चार जणांसाठी ४० मजली इमला उभा करू शकले असते किंवा गेलाबाजार राजकारण्यांना तरी खिशात घालू शकले असते. आपल्याकडची सात पिढय़ांची धन करायची प्रथा आणि उच्च संस्कृती त्यांना माहीत नसावी. बिच्चारे! त्यांनी यातलं काहीही केलं नाही.
असो. पण बफे नुसतं इथंच थांबले नाहीत तर त्यांनी बिल गेटस् आणि त्याची तितकीच सेवाभावी पत्नी मेलिंडा गेटस् यांना एकत्र घेऊन एक संस्था काढली. तिचं नावच मुळी आहे ‘द गिव्हिंग प्लेज’.  दातृत्वाची प्रतिज्ञा. ऑगस्ट २००९ मध्ये या संस्थेचा जन्म झाला. त्याबाबतच्या सभेसाठी बिल गेटस्नी आमंत्रण दिलं डेव्हिड रॉकफेलर यांना. हा तेलसम्राट रॉकफेलर कुटुंबातला. यांच्या नावावरही अनेक चांगली कामं आहेत. तेही बैठकीला यायला हो म्हणाले. कोण कोण होते या बैठकीत..टेड टर्नर, म्हणजे सीएनएन, टाइम वगैरेचे मालक, मायकेल ब्लुमबर्ग हे न्यूयॉर्कचे महापौर आणि त्याच नावाच्या वृत्तवाहिनी कंपनीचे प्रमुख, लेहमन ब्रदर्स, ब्लॅकस्टोन आदी कंपन्यांचे प्रमुख पीट पीटरसन, दुसरा महागुंतवणूकदार जॉर्ज सोरोस, ऑफ्रा विनफ्रे (म्हणजे अमेरिकेची सुधीर गाडगीळ.. ही तुलना अर्थातच चांगल्या अर्थाने)आदी. या बैठकीत उपस्थितांना सांगण्यात आलं, ‘‘तुम्हाला जगायला नक्की किती पैसे लागणार आहेत, याचा एकदा अंदाज घ्या.. त्यासाठी लागतील तितके पैसे बाजूला ठेवा आणि राहिलेल्याचं नक्की काय करायचं ते ठरवा. ’’
असं सांगताना या तिघांना याचा अंदाज होता की सगळेच काही आपल्याइतकं दातृत्व दाखवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्यासारख्या धनवानांना आवाहन केलं की तुम्ही तुमच्या संपत्तीतला फार नको.. पण किमान ५० टक्के वाटा तरी चांगल्या कामासाठी बाजूला काढून ठेवा.
आपल्या आवाहनाला सगळय़ांनी पाठिंबा दिला तर किती पैसे उभे राहतील, याचंही गणित त्यांनी मांडलं. जगातल्या फक्त ४०० महाधनवानांच्याच हाती १,२०,००० कोटी डॉलर्सची संपत्ती एकवटलेली आहे. त्यातले निम्मे जरी त्यांनी दिले तरी ६०,००० कोटी डॉलर्स समाजकार्यासाठी उपलब्ध होतील, असं या तिघांना वाटतं. आणि यातला महत्त्वाचा भाग असा की ही संपत्ती फक्त बिगर-अमेरिकी धनवानांचीच आहे. बफे आणि गेटस् यांच्या म्हणण्यानुसार फक्त अमेरिकेतले लक्ष्मीपुत्र घेतले तरी याच्या दुप्पट धन त्यांच्या तिजोरीत असेल. खरा थक्क करणारा भाग असा की, अमेरिकेतल्या ४० सुपरo्रीमंतांनी आपापला वाटा ‘द गिव्हिंग प्लेज’ या संस्थेला द्यायचं कबूल केलंय. आजच्या आकडेवारीनुसार १२,५०० कोटी डॉलर्स जमाही झालेत. आता याच कामाच्या प्रचारासाठी बफे भारतात येणार आहेत. चीनमधेही त्यांना जायचं आहे.
मोठय़ा देशांचा पाया ही अशी माणसं असतात. आपल्याकडेही ती आहेत. अगदीच ठणठणपाळ नाही आपण. पण अशांची संख्या एकूणच बेताची. देश स्वतंत्रही झाला नव्हता तर होमी भाभा यांच्यासारख्या द्रष्टय़ा शास्त्रज्ञानं पं. जवाहरलाल नेहरू यांना लिहिलं, स्वातंत्र्यलढा वगैरे ठीकच आहे, पण देश स्वतंत्र झाल्यावर तुम्हाला तो उभा करायचाय तर प्रशिक्षित अभियंते कुठे आहेत, ते काही एका रात्रीत तयार होत नाहीत. आतापासून त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ते पत्र नेहरूंनी टाटांकडे पाठवलं. टाटांनी कोटभर रुपये काढून दिले आणि बघता बघता टाटा मूलभूत संशोधन संस्थेचा जन्म झाला १९४५ साली.
पण ते तेव्हा.
‘धन जोडोनिया उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी..’ असं त्यांना कोणी सांगावं लागलं नाही.Thanks Loksatta .. Link to Original Article 

No comments:

Post a Comment