विश्वचषकाचे साखळी सामने संपले. आता बाद फेरीतील थरार आम्ही अनुभवतो आहोत. दर चार वर्षांनी फुटबॉलचे वारकरी होत विश्वचषकाचा आनंद लुटतो आहोत.
पण काय हो, विश्वचषकात भारत का नाही?
.. सर्वसामान्य फुटबॉलप्रेमींना सतावणारा हा सवाल.
पण, गेल्या आठवडय़ामधील पोर्तुगाल विरुद्ध उत्तर कोरिया हा सामना ऐतिहासिक ठरला! पोर्तुगालने नोंदविलेल्या सात गोलांमुळे नाही, तर त्या सामन्यामध्ये सहा भारतीय युवक फुटबॉलपटूंना चक्क सामन्याच्या मैदानात पदार्पण करण्याची संधी मिळाली! आफ्रिकेतील विश्वचषकात भारत पोचला!
वास्तविक, विश्वचषक स्पर्धा आणि भारतीय फुटबॉल संघाचा दूर दूर तक संबंध नाही. जागतिक फुटबॉल महासंघाच्या मानांकनामध्ये आपले स्थान १३३ वे. ते जाऊ देत. विश्वचषक पात्रता फेरीची प्राथमिक फेरी पार करून आपण दुसऱ्या टप्प्यात देखील जाऊ शकत नाही. विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न सोडाच! ‘दहावी फ’मधील विद्यार्थ्यांकडून अभ्यासात पहिले येण्याची अपेक्षा ती काय करणार!
उद्घाटनाच्या सोहळ्यामध्ये सलीम-सुलेमानच्या माध्यमातून भारतीय सूरावटीने विश्वचषकाचे मैदान जिंकले होते. आता त्याच्याही पलीकडे जाऊन भारतीय युवा पिढीने मैदान काबीज केले!
खरं तर भारताचा विश्वचषकात १९५० साली प्रवेश झाला होता. पी. के. बॅनर्जी, चुन्नी गोस्वामी यांच्यासारखे बुजूर्ग फुटबॉलपटू त्या वेळच्या आठवणी सांगतात. कोलकात्यामधील मोहन बगान-ईस्ट बंगालमधील वयोवृद्ध फुटबॉलप्रेमी तेव्हाच्या ‘हार्टब्रेक’बाबत भरभरून बोलतात. ब्राझीलमध्ये १९५० साली झालेल्या विश्वचषकासाठी भारत पात्र ठरला होता. स्वीडन, इटली आणि पॅराग्वेसह तिसऱ्या गटामध्ये त्याचा समावेश होता.
वास्तव वेगळेच आहे. महायुद्धामुळे ४२ आणि ४६ सालची स्पर्धा होऊ शकली नाही. महायुद्धाच्या पाश्र्वभूमीवर युरोपीय देशांमध्ये ५० ची स्पर्धा भरविल्यास त्यावर बहिष्कार टाकला जाण्याची भीती होती. त्यामुळे स्पर्धा पोचली ब्राझीलमध्ये. पात्रता गटामध्ये बर्मा, इंडोनेशिया फिलिपिन्स यांचा समावेश होता. परंतु, भूराजकीय कारणास्तव त्यांनी माघार घेतली आणि आशियातील गट क्रमांक १० मधून भारत पात्र ठरला! ‘फिफा’नेही भारताच्या सहभागास मान्यता दर्शवली. पण, तेव्हाच्या स्वतंत्र भारतामधील धोरणांनी कच खाल्ली. विश्वचषकाचे महत्त्वच ते ओळखू शकले नाहीत. एवढा खर्च सोसून संघाला विश्वचषकात पाठविण्यास नकार देण्यात आला. वास्तविक, भारताच्या प्रवासखर्चाचा मोठा भार पेलण्याचे ‘फिफा’ने मान्य केले होते. पण, भारतीय सरकारने परवानगी दिली नाही. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुरेशी तयारी झालेली नाही, असे जुजबी कारण पुढे करण्यात आले.
स्पर्धेत खेळण्यायोग्य बूट नसल्याने भारताने सहभाग मागे घेतला, असे पुढे अनेक वर्षे, अगदी आजपर्यंत सांगितले जात आहे. पण, ते साफ झूट आहे. क्रीडाधोरण आणि एकूणातच खेळांबद्दलच्या असंवेदनशील, उदासीन दृष्टिकोनामुळेच भारताचा विश्वचषकातील सहभाग नाकारला गेला.
१९५६ सालच्या मेलबोर्न ऑलिम्पिकमध्ये भारताने चौथे स्थान पटकाविले. १९६० च्या ऑलिम्पिकसाठीही आपण पात्र ठरलो होते. बलाढय़ फ्रान्सला १-१ असे बरोबरीत रोखण्यात यश आले होते. त्या काळच्या फुटबॉलपटूंची कामगिरी पाहता ५० च्या संघाने विश्वचषकात काही तरी करिष्मा नक्कीच केला असता, असे मानले जात आहे.
असो.
यंदाच्या विश्वचषकात सहा भारतीय विद्यार्थी-फुटबॉलपटू सहभागी झाले, ते ‘फिफा’च्या ‘फेअर प्ले बॅनर’ योजनेतून. प्रत्येक सामन्याच्या प्रारंभी तुम्हाला सहा मुले पिवळ्या रंगाचा बॅनर मैदानात घेऊन येताना दिसतील. त्यावर ‘फेअर प्ले’ असे लिहिले असते आणि दोन्ही देशांचे राष्ट्रगीत होऊन खेळाडूंच्या हस्तांदोलनानंतर अगदी टॉस होईपर्यंत तो बॅनर मैदानात असतो. पोर्तुगाल-उत्तर कोरिया सामन्याच्या वेळचा बॅनर नेण्याचा मान सहा भारतीय चिमुकल्यांना मिळाला होता. देशभरातून या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली नि त्यामधील सहा जणांना संधी देण्यात आली.
सामन्यापूर्वी आपल्या लाडक्या रोनाल्डोशी (दीर्घकाळ इंग्लंडमधील मँचेस्टर युनायटेडमध्ये कारकीर्द घडविल्यानंतर आता स्पेनच्या रिअल माद्रिदकडून खेळणारा पोर्तुगालचा फॉरवर्ड) हस्तांदोलन करण्याची संधी मिळाल्याने ही भारतीय बच्चेकंपनी खूष होती.
पण, तेवढाच काय तो भारताचा विश्वचषकातील सहभाग.
आता २०१४ सालचा विश्वचषक ब्राझीलमध्ये होणार आहे. २०१८ साली बहुदा युरोपला पुन्हा ती संधी दिली जाईल. त्यानंतर आशियाला यजमानपद देण्याचा ‘फिफा’चा विचार आहे. त्यामुळेच, २०२२, २६ किंवा २०३० साली भारताला विश्वचषकाचे आयोजन करण्याची संधी साधता आली, तरच विश्वचषकाचे जवळून दर्शन घेण्याची पर्वणी भारतीय फुटबॉलप्रेमींना मिळेल.
प्रेसिडेंट्स कॉल
आफ्रिकेतील युद्धभूमीवर युरोपीय महासत्तांचा पाडाव होत आहे. गतविजेता इटली, ९८ सालचा विजेता आणि गतवेळचा उपविजेता असे बलाढय़ भासणारे संघ आफ्रिकेत गारद झाले. आफ्रिकेतील हाराकिरीनंतर हे संघ माघारी परतले आहेत. मार्चेलो लिप्पी या इटलीच्या प्रशिक्षकांसह चार वर्षांपूर्वी विश्वचषक उंचाविणारा कर्णधार फॅबियो कॅनाव्हारो याच्यासह वरिष्ठ खेळाडूंनी जाहीर माफी मागून गतविजेत्याला साजेसा खेळ करू न शकल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. वयोवर्धनाचा (एजिंग), म्हणजेच खेळाडूंच्या वाढत्या वयाचा फटका आम्हाला बसला, असे त्यांनी सांगितले.
फ्रेंच संघातील बंडाळी तर उघडपणे व्यक्त झालेली साऱ्या जगाने पाहिली. म्हणूनच की काय, विमानतळावर संघ दाखल झाल्यानंतर आघाडीचा खेळाडू थिअरी हेन्री याच्यासह मार्गदर्शक रेमण्ड डॉमिनिच यांना थेट राष्ट्राध्यक्ष सार्कोझी यांनी बोलाविले. त्याचप्रमाणे क्रीडामंत्री व क्रीडाखात्यानेदेखील खेळाडूंचा खरपूस समाचार घेतला. भारतीय क्रिकेट स्टारसारखे नाही! टी-ट्वेन्टी विश्वचषकातील अपयशानंतर अनफिट खेळाडू आणि प्रशिक्षकाचे आदेश धाब्यावर बसविणाऱ्या खेळाडूंनादेखील आपण गोंजारत बसलो आहोत.
फ्रान्समध्ये तसे नाही.
फुटबॉलपटूंचे सर्व चोचले बंद करून फ्रेंच फुटबॉलच्या पुनर्उभारणीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यास प्रारंभ केला आहे. यापुढील २०१६ साली होणाऱ्या युरोचषक स्पर्धेचे यजमानपद फ्रान्सला याच वर्षी बहाल करण्यात आले आहे. त्या पाश्र्वभूमीवर फ्रेंच फुटबॉलविश्वाची आफ्रिकेत टांगली गेलेली लक्तरे हे युरोपीय फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष व दिग्गज फ्रेंच फुटबॉलपटू मायकेल प्लॅटिनी यांना नक्कीच झोंबली असणार!
धन्यवाद लोकसत्ता ...