Tuesday, June 22, 2010

सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मराठी भाषा धोरण म्हणजे - राज्याच्या कामासाठी लागतात अशी कपाटे.

Birbal Badashah story continued ...

बादशहाला वाटले की राज्याला एक सांस्कृतिक धोरण असावे. बादशहाने लगेचच सांस्कृतिक सचिवाला बोलावले आणि आदेश दिला, राज्यातील विद्वानांची एक समिती स्थापन करा आणि त्यांच्याशी विमर्श करून राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरवा. आपण बिरबलाशी सल्लामसलत न करताही किती शहाणपणाचा निर्णय घेतला म्हणून बादशहाने मान उंचावून बिरबलाकडे पाहिले. बिरबलाने लगेचच सुतारकाम खात्याच्या प्रमुखाला बोलावणे पाठवले आणि एक मोठे मजबूत कपाट तयार करण्याचे आदेश दिले. बादशहाने आश्चर्याने पाहिले तेव्हा बिरबल म्हणाला, ‘राज्याच्या कामासाठी लागतात अशी कपाटे.’ बादशहाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर वर्षभर विद्वानांच्या बैठका होत राहिल्या आणि त्यातून सांस्कृतिक धोरणाचा एक मसुदा तयार करण्यात आला. त्या मसुद्यावर सांगोपांग चर्चा झाली आणि मग त्या मसुद्याला अंतिम रूप देण्यात आले. मसुद्याचे काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. या सर्व काळात बादशहाने मुद्दामच बिरबलाकडे हा विषय काढला नाही. कारण आपल्या प्रत्येक निर्णयात बिरबल काहीतरी खुसपट काढून मोडता घालतो असे त्याला वाटत होते. अखेर मसुद्याचे प्रकाशन वगैरे झाल्यावर एक दिवस बादशहाने स्वत:च बिरबलाकडे विषय काढला. ‘आम्ही सांस्कृतिक धोरणाचा मसुदा तयार केला ते बहुधा तुला आवडलेले दिसत नाही.’ बिरबल तत्परतेने म्हणाला, ‘छे, छे! आपण अत्यंत योग्य काम केले. राज्याचे एक सांस्कृतिक धोरण असावे आणि काही विद्वानांनी एकत्र येऊन त्याचा मसुदा तयार करावा, हा अतिशय उत्तम निर्णय होता.’ बादशहाने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि विचारले, ‘तुझं मत काय आहे, या धोरणाविषयी?’ बिरबलाने कमरेला लटकवलेली एक भली मोठी चावी काढली आणि बादशहाच्या हाती देत म्हणाला, ‘चावी क्रमांक ५४८!’ बादशहा गोंधळून म्हणाला, ‘म्हणजे? मला कळले नाही!’ बिरबल म्हणाला, ‘खाविंद, अतिशय सुबक, नेटक्या पद्धतीने छापलेल्या विविध विषयावरील उत्तम मसुद्याची ५४७ कपाटे आधीच आहेत आपल्याकडे, आता या नव्या मसुद्याचे जे कपाट आहे, त्याचा क्रमांक आहे ५४८!’ बादशहा जरा घुश्श्यानेच म्हणाला, ‘तुला काय म्हणायचे आहे बिरबल?’ बिरबल त्याच स्वरात म्हणाला, ‘आधीची ५४७ कपाटे एकदा बंद केल्यावर परत कधीच उघडली गेली नाहीत, एवढेच मला सांगायचे होते.’ बादशहाचा चेहरा अपराध भावाने भरून गेला.

धन्यवाद लोकसत्ता ...

Connect Me TwitterGoogle 
ReaderBloggerOrkutFacebookGoogle

No comments:

Post a Comment