४८व्या वर्धापनदिनानिमित्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने प्रसिद्ध केलेल्या तरुणाईचा वेध घेणा-या या विशेष अंकाचे
'गेस्ट एडिटर' आहेत, प्रख्यात लेखक चेतन भगत. खास 'मटा'च्या वाचकांशी त्यांनी साधलेला हा संवाद.
संवादाची माध्यमे दिवसेंदिवस प्रभावी होत आहेत. आज मी येथे गेस्ट एडिटर म्हणून आलो तेही ट्विटरमुळे. 'मटा'च्या वर्धापनदिनाचे निमंत्रण आणि तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मला या माध्यमाने दिली. इंटरनेटच्या माध्यमातूनच माझ्या पुस्तकाविषयीचे, लेखांविषयीचे तरुणांचे अभिप्राय, त्यांची मते, त्यांची लाइफस्टाइल जाणून घेता येते. याच तरुण वाचकांनी मला त्यांची ओळख करून दिली.
आजचा तरुण काय विचार करतो, ही आजच्या वर्धापनदिनाच्या अंकाची संकल्पना आहे. मला त्याबद्दल विचाराल, तर मी सांगेन की, आजच्या तरुणांचे विश्व 'करिअर आणि रोमान्स' याभोवतीच फिरतेय...तरुणांच्या पसंतीक्रमावर याच दोन गोष्टी आहेत...माझ्याशी संवाद साधणारे तरुणच मला ते सांगतात. अर्थात प्रेमाव्यतिरिक्तही अनेक गोष्टी आहेत. एका चॅनेलसाठी अँकर शोधण्याच्या टीममध्ये मी आहे. तिथे येणाऱ्या तरुणांमध्ये क्षमता आहे. पण ती वाढवण्यासाठी, तिला योग्य आकार देण्यासाठी मेहनत घेण्याची त्यांची तयारी नाही. प्रत्येक गोष्टीबाबत जिज्ञासा, औत्सुक्य हवे. भोपाळ दुर्घटना असो वा आयपीएल, प्रत्येक गोष्टीची मुळापासून माहिती घेण्याची जिज्ञासा तरुणांनी मनापासून बाळगायला हवी. आपल्या शिक्षणपद्धतीत क्रिएटिव्हिटीला काही स्थानच दिलेले नाही. मुलांना आपण विचार करायलाच शिकवत नाही. त्यामुळे परदेशाप्रमाणे आपल्याकडे क्रिएटिव्हिटीची फार उदाहरणे दिसत नाहीत. आपण अनेक स्वस्त आयटी इंजिनीअर जगाला मिळवून दिले. पण गूगल, याहू, फेसबुक यांसारख्या एकाही प्रसिद्ध वेबसाइटची संकल्पना भारतीयाला तयार करता आली नाही. लाखो सॉफ्टवेअर इंजिनीअर असतानाही हे का घडले, याचा विचार करायला हवा.
राजकारणाबाबत मुले उत्साही नाहीत. पण उच्चशिक्षित, उत्तम नेते त्यांना प्रेरित करू शकतात. एक चांगला लेखक जसा इतर दहा जणांना लिहिण्यासाठी प्रेरित करू शकतो, त्याचप्रमाणे हे आहे. मराठी तरुण खूप 'सिम्पल' आहे. महाराष्ट्राला स्वत:ची संस्कृती आहे. पण ती पुढे आणण्यासाठी मराठी माणसानेच प्रयत्न करायला हवेत. पंजाबमध्ये खाण्याची, संगीताची संस्कृती आहे. पॉप म्युझिक पंजाबी लोकांनी डॉमिनंट केले आहे. मराठी माणूस का नाही त्यांच्या खाद्यसंस्कृतीची रेस्टॉरंट काढत? त्याचे मार्केटिंग करत? मराठी माणूस सिम्पल आहे. मुघल येथे फारसे न आल्याने मराठी संस्कृती अभेद्य राहिली आहे. पण ती जतन केली पाहिजे. त्यात अधिकाधिक लोकांना सामावून घेतले पाहिजे.
मार्क म्हणजे सर्वस्व नाही
दहावीचा निकाल पाहिला. कितीतरी जणांना शंभर टक्के मिळाले आहेत. त्यामुळे ९० टक्के मार्क मिळालेली मुलेही टेन्शनमध्ये दिसताहेत. पण मार्क म्हणजेच सर्वस्व नाही, हेही आज तरुणांना सांगण्याची वेळ आली आहे. मला दहावीला केवळ ७६ टक्के आणि बारावीला ८५ टक्के होते. तरीही आता मी खूप छान आयुष्य जगतो आहे. कमी मार्क मिळवूनही आपण आयुष्यात बरेच काही करू शकतो, हे तरुणांना प्रसारमाध्यमांनी सांगावे, असे मला वाटते. मुलांनीही शिकण्याची वृत्ती ठेवण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment