Sunday, May 16, 2010

हिरा जपणार कोंदण तेवढच महत्वाचे !!!

प्रत्येक जन हिरा असू शकत नाही... पण हिरयाला जपायला कोंदण लागत ...आणि ते तेवढच महत्वाच असत ...


Another बिरबल बादशाह स्टोरी...


नवीन वर्षांत अमूक करायचं, तमूक करायचं असे संकल्प रोज कुठून कुठून कानावर पडत होते. बादशहा रात्री धाकटय़ा बेगमसोबत गप्पा मारत बसला होता तेव्हा बेगम म्हणाली, ‘खाविंद, आपण नव्या वर्षांचा संकल्प काय सोडणार आहात?’ बादशहा म्हणाला, ‘मी काही विचार केलेला नाही. आणि संकल्प वगैरे सोडण्यावर माझा विश्वास नाही.’ दुसऱ्या रात्री मोठय़ा बेगमनेही बादशहाला तोच प्रश्न विचारला. बादशहानं तिलाही तेच उत्तर दिलं. मग तिसऱ्या रात्री दोन्ही बेगमनी संगनमत केलं आणि हट्ट धरला. बादशहा म्हणाला, ‘तुमचा एवढा जर हट्ट असेल तर मग तुम्हीच सांगा, काय संकल्प सोडू?’ तेव्हा दोन्ही बेगम म्हणाल्या, ‘सगळीकडे अशी चर्चा आहे की, बादशहाचं राज्य बिरबलाच्या अक्कलहुशारीवर सुरू आहे. नवीन वर्षांत बिरबलाची मदत न घेता राज्यकारभार करण्याचा संकल्प सोडा आपण?’’ दोन्ही बेगमचा हा विचित्र हट्ट पाहून बादशहा विचारात पडला. परंतु त्यानं बेगमना शब्द दिला होता. त्यानुसार यापुढं राज्यकारभारात बिरबलाची मदत घ्यायची नाही असा संकल्प त्यानं सोडला. अर्थातच हळूहळू ही बातमी सगळीकडे पसरली. तिसऱ्या दिवशी बिरबलानं दोन्ही बेगमना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. बेगमना वाटले, बिरबल शरण आला आहे आणि तो आपल्याला विनंती करून बादशहाला संकल्प मागे घ्यायला सांगेल. परंतु बिरबलानं दोन्ही बेगमना कुर्निसात केला आणि मौल्यवान हिऱ्यांच्या अंगठय़ांचा नजराणा बेगमना पेश केला. आपण दिलेली अंगठी बेगमनी, राजदरबारात येताना बोटात घालून यावी अशी विनंती त्याने दोघींनाही केली. त्याच्या या वागण्याने बेगम गोंधळात पडल्या. परंतु त्यांनी बिरबलाची विनंती मान्य केली. दुसऱ्या दिवशी दरबारात मात्र त्या अंगठी न घालताच आल्या. बिरबलानं कारण विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘तू दिलेल्या अंगठीमधले हिरे खूपच मौल्यवान आहेत, सुंदर आहेत, परंतु तू अंगठी मात्र पितळेची दिलीस, त्यामुळे आम्हाला तुझी विनंती मान्य करता आली नाही..’ बिरबल कुर्निसात करून म्हणाला, ‘बेगमसाहिबा, माझी बुद्धीसुद्धा त्या हिऱ्यांसारखी आहे. बादशहाच्या कोंदणात आहे म्हणून तिला महत्त्व आहे. अन्यथा मी एक सामान्य माणूस आहे.’ बिरबलाचं उत्तर ऐकून खजिल झालेल्या बेगमनी आपला हट्ट मागे घेतला. आणि बिरबलाची सगळी योजना आधीच ठावूक असलेल्या बादशहानं त्या आनंदाप्रित्यर्थ बिरबलाला शाही भोजनाचं निमंत्रण दिलं!

No comments:

Post a Comment