वृत्तवाहिन्यांवर अनेक आक्षेप घेतले जातात. अलीकडे मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तर या आक्षेपांचा जोर वाढला आहे. याबाबत जबाबदार इलेक्ट्रॉनिक माध्यमांची बाजू काय आहे, वास्तव काय आहे, याचे विश्लेषण -
टीव्हीवाल्यांची अक्कल काढणे हा गेल्या काही दिवसांपासून आपला राष्ट्रीय कार्यक्रम झाला आहे. बालबुद्धीच्या नवशिक्या पोरासोरांपासून पांडित्याची झूल अंगावर पांघरून वावरणाऱ्या विद्वतजनांपर्यंत प्रत्येकाला सध्या एकाच प्रश्नाने गांजलेले दिसते आहे. या टीव्हीवाल्यांचे करायचे काय? विशेषत: न्यूज चॅनेलवाल्यांचे..
शक्य असते तर या मंडळींनी चॅनेलवाल्यांना अंगठे धरून वर्गाबाहेर तरी उभे केले असते किंवा अरबी समुद्रात तरी नेऊन बुडवले असते! कारण या तमाम विद्वानांची ठाम खात्री आहे की, या देशाचा, आपल्या समाजाचा आणि एकंदरच आपल्या साऱ्या सांस्कृतिक परंपरांचा ऱ्हास टीव्हीवाल्यांच्या बेतालपणामुळे आणि विधिनिषेधशून्यतेमुळे सुरू झाला आहे.
आणि एकदा हा निष्कर्ष काढून झाला की, मग टीव्हीवाल्यांना भुईसपाट करण्यासाठी टीकेचा असा काही भडिमार केला जातो की, भल्याभल्यांची दाणादाण उडावी. त्यातले काही बाण तर एकदम हुकमी असतात- या टीव्हीवाल्यांना फक्त चॅनेलच्या टीआरपीची
फिकीर असते.. टीआरपी वाढवण्यासाठी दिवसभर काय वाटेल ते दाखवत असतात.. एकदा एखादी सनसनाटी बातमी त्यांच्या हाती लागली की ते तेच गुऱ्हाळ लावून बसतात.. दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयाशी त्यांना काही देणे-घेणे नसते.. त्यांचा सगळा इंटरेस्ट सिनेमा, खून, मारामाऱ्या यामध्येच.. तीच तीच बातमी किती वेळा दाखवणार..? प्रेक्षकांना काय हे मूर्ख समजतात काय..? वगैरे!
ही सरबत्ती कमी म्हणून की काय, गेल्या महिनाभरापासून या आरोपांमध्ये आणखी एकाची भर पडली- प्रत्येक गोष्ट लाइव्ह दाखवण्याच्या चॅनेलवाल्यांच्या अतिरेकी उत्साहाची..! ताज आणि ओबेरॉयमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांचा नि:पात करण्यात लाइव्ह प्रक्षेपणाने अडथळे आले आणि त्यांचा पुरता फायदा दहशतवाद्यांना मिळाला. याचा मथितार्थ एवढाच की, स्वत:च्या तुंबडय़ा भरण्यात मश्गुल असलेल्या चॅनेलवाल्यांना या देशाचीही फिकीर नाही..
टीव्हीवाल्यांकडे पाहण्याची आपल्या समाजाची सध्याची दृष्टी ही अशी आहे.
पण यामध्ये सच्चाई किती, गैरसमज किती आणि अर्धवट ज्ञानातून आलेली अज्ञानमूलक टीका किती, याकडे लक्ष द्यायलाच कुणी तयार नाही. काही क्षणांसाठी थांबून टीव्हीवाल्यांवर होणाऱ्या टीकेत तथ्यांश किती, हे आपण कधी जाणून घेणार की नाही!
हे माध्यम समजून घेण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून चॅनेलवर घेतल्या जाणाऱ्या आरोपांची आपण शहानिशा करूया. त्याने सारेच गैरसमज दूर होतील असे नाही. पण किमान हे माध्यम समजायला तरी मदत होईल.
पहिला आक्षेप हा की, न्यूज चॅनेलवर त्याच त्याच बातम्या पुन: पुन्हा दाखविल्या जातात. खरे तर हा आरोप अत्यंत तकलादू आहे. चोवीस तासांचे न्यूज चॅनेल चालवणाऱ्यांनी प्रत्येक मिनिटाला नवी बातमी द्यावी अशी अपेक्षा बाळगणेच मुळात बाळबोधपणाचे आहे. असे होत नसते. प्रत्येक घडीला जगामध्ये हजारो प्रकारच्या बातम्या घडत असतात. पण त्या प्रत्येक बातमीत आपल्याला रस असतोच असे नाही. त्या हजारो बातम्यांमधल्या निवडक (ज्या आपल्या आयुष्याशी संबंधित आहेत किंवा ज्या बातम्या ऐकायला किंवा पाहायला आपल्याला आवडतील अशा मोजक्याच) बातम्या टीव्हीवरून दाखवल्या जातात. हे करतानाच हातातल्या रिमोटशी सतत चाळा करणाऱ्या प्रेक्षकाला चॅनेल लावल्या क्षणी खिळवून ठेवण्याची कर्तबगारी चॅनेलवाल्यांना करावी लागते आणि त्याचवेळी आलेल्या प्रेक्षकाला चॅनेल लावल्याक्षणी त्यावेळेपर्यंतच्या बातम्या जाणून घेण्यात स्वारस्य आहे, याचेही भान ठेवावे लागते. एखाद्या न्यूज चॅनेलवर ‘अपरिमित प्रेम करणारा’ एखादा प्रेक्षक सलग चार तास तेच चॅनेल बघत राहिला तर एखादी बातमी त्याला चार वेळा पहावी लागेलही. पण त्या वेळेपर्यंतची ती महत्त्वाची बातमी असेल तर ते स्वाभाविकच नाही का? चॅनेलच्या कार्यपद्धतीवर टीका करणाऱ्या प्रत्येक स्वयंघोषित विचारवंताने हे लक्षात घ्यावे की, एखादी बातमी चॅनेलवर दहा वेळा दाखवली जाते, तेव्हा त्यामागचा हेतू एकाच प्रेक्षकाने ती बातमी दहा वेळा पाहावी हा नसतो, तर दहा प्रेक्षकांनी किमान एकदा तरी ती पाहावी, हा असतो. (आणि काही तुरळक अपवाद सोडले तर बहुसंख्य प्रेक्षक बातम्या तशाच पद्धतीने बघतात.)
आजकाल न्यूज चॅनेलवर दुसरा आक्षेप घेतला जातो तो थिल्लरपणाचा! २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर तर रांगणारी बाळेसुद्धा चॅनेलवाल्यांना शहाणपणाचे डोस देत फिरू लागली आहेत. त्या अपप्रचाराचा तर सविस्तरपणेच समाचार घेतला पाहिजे. धादांत खोटी विधाने आणि तद्दन भंपक आरोप! आश्चर्य म्हणजे, अपुऱ्या माहितीच्या आधारे आरोप करणाऱ्यांच्या पलटणीत भली भली माणसेही मेंढरासारखी सामील झाली आणि सतत रेकून त्यांनी एक गोष्ट प्रेक्षकांच्या गळी उतरवली की, तमाम चॅनेलवाले बेपर्वा आहेत. त्यांना या देशाशी, आपल्या सुरक्षाव्यवस्थेशी काहीही देणेघेणे नाही.
या आरोपांचे खंडण करताना, सगळ्या चॅनेलना एका तागडीत मोजण्याऐवजी मराठी कुटुंबांमध्ये जी चॅनेल पाहिली जातात, त्यांच्या अनुषंगाने बोलणेच योग्य ठरेल.
चॅनेलवरून सगळेच लाइव्ह दाखवले जात असल्याने अतिरेक्यांना बाहेरच्या सगळ्या गोष्टी, पोलिसांच्या आणि लष्कराच्या हालचालींची वगैरे इत्थंभूत माहिती आपोआप समजत होती, वगैरे वगैरे.. नरिमन हाऊसवर हेलिकॉप्टरमधून कमांडो उतरवतानाची दृश्ये दाखवून तर मीडियाने जणू देशद्रोह केल्याचा आव हल्ली सर्रास आणला जातो. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तर टीव्हीवरची ही दृश्ये पाहून आतल्या अतिरेक्यांना कमांडोच्या हालचाली कळल्या आणि त्यामुळेच एका कमांडोला आपला जीव गमवावा लागला, असा जावईशोध लावून अपप्रचारकांच्या मांदियाळीमध्ये अग्रक्रमांक पटकावला.
या संदर्भात काही गोष्टी कायमसाठी स्पष्ट करणे गरजेचे आहे. आपल्या सुरक्षा आणि सरकारी यंत्रणा मूर्ख नाहीत. त्यांनी कारवाई सुरू करण्यापूर्वी नरिमन हाऊसचा वीजपुरवठा बंद केलेला होता. त्यामुळे तिथे टीव्ही पाहता येणे अशक्य होते. ताज आणि ओबेरॉयच्या केबल यंत्रणाही आधीच बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे टीव्ही पाहून अतिरेक्यांना आपले डावपेच आखता येत होते, हा युक्तिवाद मुळातच फुसका ठरला! पण मग हल्ली नवा युक्तिवाद केला जाऊ लागला. अतिरेक्यांचे गॉडफादर पाकिस्तानात बसून टीव्ही पाहत होते आणि तिथून ते कमांडोंच्या लाइव्ह हालचालींविषयी माहिती देत होते. ही म्हणजे पुन्हा एक लोणकढी थाप.
नरिमन हाऊसची भौगोलिक रचना ज्यांना माहिती आहे, त्यांना अंदाज येईल की सुरक्षा यंत्रणांनी घेरलेल्या त्या गल्लीवजा भागात ओबी व्हॅन्स नेऊन लावणेच तेव्हा अशक्यप्राय होते. साहजिकच, प्रत्येक चॅनेलला किमान एखादा किलोमीटर अंतरावर आपल्या व्हॅन उभ्या कराव्या लागल्या होत्या. प्रत्यक्ष कमांडो उतरले तेव्हा समोरच्या बिल्डिंगमधून ती दृश्ये टिपून प्रक्षेपणासाठी ती टेप घेऊन प्रत्यक्ष ओबी व्हॅनपर्यंत जाण्याचा कालावधी हा किमान १६ ते १८ मिनिटांचा होता. पुढचा भाग सॅटेलाईटमार्फत दृश्ये चॅनेलवर दाखवण्याचा..! प्रत्यक्षात कमांडो उतरल्यानंतर किमान २० मिनिटांनी जर अतिरेक्यांना त्यांचे गॉडफादर ‘.. कमांडो उतर रहे है..’ अशी बकवास आणि दिशाभूल करणारी माहिती देऊ लागले, तर त्यांची किंमत अतिरेक्यांनीच केली असती.
नरिमन हाऊसच्या डोक्यावर जेव्हा गरगरणारे हेलिकॉप्टर आले, त्याच क्षणी आतल्या अतिरेक्यांना कमांडो उतरण्याची तयारी सुरू झाल्याचा अंदाज आला असणार. हेलिकॉप्टरचा आवाज काही कमी नसतो. ते हवेतून उंचावरून जाते तेव्हाही गावातली मुले हेलिकॉप्टर बघायला अंगणात येतात. पूर्ण प्रशिक्षण घेतलेल्या अतिरेक्यांना शंभर फूट डोक्यावर हेलिकॉप्टर आल्याचे काय टीव्हीवर दिसल्यावर कळले असणार?
आपल्या मीडियाचे सगळेच बरोबर असते किंवा आहे, असे नाही. अजूनही उत्साहाच्या भरात काही चुका होऊन जातात. पण म्हणून त्यांना किती बदडून काढायचे, याला काही मर्यादा?
चार वर्षांपूर्वी मुंबईच्या लोकलगाडय़ांमध्ये स्फोट झाले. न्यूज चॅनेल्सवर रक्तामांसाचे गोळे आणि इतस्तत: विखुरलेल्या मृतदेहांची दृश्ये दिसली. त्यावर बरीच टीका झाली. ती योग्यही होती. अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये तीन हजारांवर लोक मेले, पण एकही मृतदेह टीव्हीवर दिसला नाही, याचे दाखले दिले गेले. अनुभवाने शहाणे झालेल्या आपल्या चॅनेलवाल्यांनी यावेळी ते भान नक्कीच दाखवले. अंगावर काटा आणणारी दृश्ये चॅनेलवर दिसली नाहीत. म्हणूनच तर जगभरातल्या असंख्य चॅनेल्सवर ‘स्टार माझा’सारख्या चॅनेलचे लाइव्ह प्रक्षेपण जसेच्या तसे उचलले गेले. अशी दृश्ये दाखवू नका, हे काही कुठल्या सरकारी कायद्याने सांगितलेले नाही. चॅनेलवाल्यांनी स्वत:च स्वत:वर नियंत्रण लावून अशा प्रकारची खबरदारी घेतली. ही प्रगल्भता आपला मीडियाही दाखवू लागला आहे, त्याचे खुल्या मनाने स्वागत केले पाहिजे.
आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, २६ नोव्हेंबरसारखी कोणतीही मोठी आणि देशातल्या प्रत्येकाच्या आयुष्यावर बरा-वाईट परिणाम करणारी घटना जेव्हा घडत असते, तेव्हा त्याचे लाइव्ह प्रक्षेपण करून जास्तीत जास्त लवकर ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणे, हे मीडियाचे इतिकर्तव्यच आहे. अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या पहिल्या टॉवरला विमानाने धडक दिल्यानंतर जगभर त्याचे लाइव्ह प्रक्षेपण सुरू होते आणि त्यामुळे दुसऱ्या टॉवरला धडक दिली जात असतानाची घटना अब्जावधी प्रेक्षकांपर्यंत त्याच क्षणी पोहोचली होती. एवढी मोठी घटना घडत असताना त्याचे प्रक्षेपण होणारच. जसे अमेरिकेत, तसेच आपल्याकडेही. लाइव्ह दाखवताना सरकारी यंत्रणांनी आखून दिलेल्या सीमांचे उल्लंघन होत नाही ना, याची खबरदारी घेतली की झाले. आपल्याकडे कोणत्याही चॅनेलने असे उल्लंघन केले नव्हते. (तेव्हा ज्या काही त्रुटी जाणवल्या होत्या, त्यावरचे उपाय
आता योजले गेले आहेत.) म्हणूनच तर त्या तीन दिवसांच्या काळात किंवा नंतरही सुरक्षा यंत्रणांनी मीडियाच्या भूमिकेविषयी कसलीही प्रतिकूल प्रतिक्रिया दिलेली नाही. टीकेचा खळखळाट सुरू होता, तो या सगळ्याशी ज्यांचा कसलाच संबंध नव्हता, अशा काही बघ्या प्रेक्षकांचाच.
टीव्ही चॅनेलच्या कार्यपद्धतीविषयी कोणी हल्ला चढविला की बऱ्याचदा टीव्हीवाले बचावात्मक पवित्रा घेतात आणि टीव्ही हे माध्यम आताशी दहा-पंधरा वर्षेच जुने आहे, त्यामुळे कमी अनुभवामुळे त्यांच्याकडून चुका होतात, असा लंगडा युक्तिवाद करू लागतात. प्रिंट मीडियाला तुलनेने जास्त मोठा इतिहास आहे आणि त्यामुळे त्यांच्याशी इलेक्ट्रॉनिक मीडियाची तुलना करून आम्हाला खिजवू नका, असा त्यामागचा ‘बिच्चारा’ युक्तिवाद असतो. पण असल्या युक्तिवादामध्ये तथ्य नाही आणि असला पळपुटा युक्तिवाद करण्याचे कारणही नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियाची बलस्थाने वेगळी आहेत आणि प्रिंट मीडियाची वेगळी. संसदेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेणाऱ्या खासदारांचा निर्लज्जपणा चॅनेलमुळेच उजेडात आला. भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात या घटनांचे वेगळे आणि निश्चित असे महत्त्व आहे. त्या गौरवास्पद गोष्टींची उपेक्षा करून मीडिया ट्रायल या शब्दाचा उपयोग शिवीसारखा करण्याची पद्धत आता रूढ होत आहे. या मीडिया ट्रायलमुळेच प्रियदर्शिनी मट्टू, जेसिका लाल, दिल्लीची बीएमडब्ल्यू केस, नोट के बदले व्होट अशा अनेक प्रकरणात न्याय मिळणे किंवा ती प्रकरणे चव्हाटय़ावर आणणे शक्य झाले. सरकारी यंत्रणा आणि राजकारणी पैशाच्या मस्तीने सारी व्यवस्था आपल्या दावणीला बांधू पाहतात, तेव्हा मीडिया ट्रायलच्या मुळे का होईना, पण सामान्यांना न्यायापर्यंत पोहोचता येते, ही खरे तर केवढी दिलासादायक बाब आहे.
बऱ्याचदा चॅनेलच्या तुलनेसाठी प्रिंट मीडियाचे दाखले दिले जातात, पण हल्लीचा प्रिंट मीडिया हा फार जबाबदारीने वागतो, असे म्हणण्याची सध्या तरी सोय नाही. २६ नोव्हेंबरच्या अतिरेक्यांच्या मनगटांना लाल दोरे होते म्हणजे ते हिंदूच होते किंवा कामा हॉस्पिटलमध्ये आलेले स्वच्छ मराठी बोलत होते- अशा बातम्या जेव्हा वर्तमानपत्रांनी छापल्या, तेव्हा त्यातून कसल्या जबाबदार पत्रकारितेचे दर्शन घडले? दुसऱ्या दिवशी पाकिस्तानातल्या वर्तमानपत्रांना पाकचा या हल्ल्याशी काहीही संबंध नाही, हे जगाला दाखवून देण्यासाठी मात्र त्यांचा नक्कीच उपयोग झाला.
न्यूज चॅनेलचे समर्थन करण्यासाठी प्रिंट मिडियाच्या बेजबाबदारपणाची उदाहरणे देण्याचे कारण नाही. त्यातून चॅनेलची गुणवत्ता वाढायला मदत होणार नाही. ही गुणवत्ता आणखी वाढली पाहिजे, हे नक्कीच. आपली चॅनेल्स आणखी प्रगल्भ झाली पाहिजेत, हे खरे. पण त्यासाठी आपल्या प्रेक्षकांनीही टीव्ही चॅनेल्स कशी बघावी, हेही शिकले पाहिजे. ज्या समाजामध्ये २६ नोव्हेंबरच्या हल्ल्याचे तीन दिवस ताज आणि ओबेरॉय परिसरात पिकनिकसारखी गर्दी केली जाते, जिथे चहा-कॉफी आणि गुटख्याची दुकाने थाटली जातात आणि आसपास सारे विषण्ण वातावरण असताना ज्या समाजातले जबाबदार नागरिक गुटख्याची पाकिटे तोंडात रिकामी करून पचापचा थुंकत, खांद्यावरच्या पोरा-बाळांना ‘वो देखो फायरिंग हो रहा है, वो देखो आग लगा दी’, असे कौतुकाने दाखवीत असतात तिथे काय बोलावे? अशा वातावरणातसुध्दा मिडियातला एक मोठा वर्ग मर्यादांचे भान राखत जबाबदारीने काम करत असतो, हे लक्षात घेतले पाहिजे.
(लेखक ‘स्टार माझा’चे मुख्य संपादक आहेत.)
राजीव खांडेकर
No comments:
Post a Comment