Sunday, May 2, 2010

IPL - क्रिकेट चा बाजार अन खेळ भावनेचा झुगार


बादशहानं राज्यात कुस्त्यांचा जंगी फड आयोजित केला होता. राज्यातल्या उद्योगपतींनी, मंत्र्यांनी एक- एक पैलवान ‘विकत’ घेतला होता. त्या पैलवानाचा खुराक, त्याचा व्यायाम, त्याची निगा यावर पैसा खर्च करून त्याचा गाजावाजा केला जात होता. राज्यात सगळीकडे या कुस्त्यांचीच चर्चा होती. कोणत्या उद्योगपतीने कोणता पैलवान किती सुवर्णमुद्रांना विकत घेतला, त्याच्या खुराकावर रोजचा खर्च किती आहे, पैलवानाची शक्ती कशी अचाट आहे यावर गप्पाष्टके झडत होती.कुस्त्यांची एक एक फेरी पार पडत होती. तसे अधिकच उधाण येत होते. अखेर ‘शेर-ए-जंगल’ आणि सिना-ए-फौलाद हे दोन पैलवान अंतिम फेरीत पोहोचले. दोन्ही पैलवान तुल्यबळ, त्यामुळे कोण बाजी मारणार यावर गरमागरम चर्चा सुरू होत्या. या चर्चानी बादशहाला एका वेगळ्याच संकटात टाकले. धाकटी बेगम होती शेर-ए-जंगलच्या बाजूची आणि मोठी बेगम होती सिना-ए-फौलादची चाहती. दोघींनाही आपलाच पैलवान जिंकावा असं वाटत होतं. दोघींनीही बादशहाकडे हट्ट धरला. ‘‘काहीही करा आणि माझा पैलवान जिंकून आणा.’’ बादशहा म्हणाला, ‘‘ते कसं शक्य आहे?’’ यावर धाकटी म्हणाली, ‘‘फौलादला वाट्टेल तेवढय़ा सुवर्णमुद्रा द्या आणि पराभव पत्करायला सांगा.’’ तर मोठी म्हणाली, ‘‘तुम्ही बादशहा आहात, शेरला आदेश द्या हरण्याचा, फौलादला हरलेला मी पाहू शकणार नाही.’’ दोघींनी बादशहाला हैराण करून सोडले तेव्हा अखेर बादशहा बिरबलाला शरण गेला. बिरबलानं सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाला, ‘‘तुम्ही दोघींनाही होकार द्या आणि काहीच करू नका, पुढचं पुढं पाहू.’’ अखेर अंतिम फेरी प्रचंड गर्दीत पार पडली. रोमहर्षक झुंज झाली आणि ‘शेर-ए-जंगल’नं बाजी मारली. बादशहा बिरबलाला म्हणाला, ‘‘आता मोठीला काय सांगू?’’ बिरबलनं बादशहाला मंत्र दिला आणि त्याचा चेहरा फुलला. राजवाडय़ावर बादशहा परतला तेव्हा छोटीनं हसून स्वागत केलं आणि मोठीनं तोंड फिरवलं. बादशहानं दोघींनाही दिवान-ए-खासमध्ये बोलावून घेतलं आणि म्हणाला, ‘‘मी दोघींनाही होकार दिला परंतु केलं काहीच नाही. लाखो लोक या लढतीकडे अटीतटीचा खेळ म्हणून बघत होते. अशा लढतीचा आधीच निकाल लावणे म्हणजे या लाखो लोकांच्या खिलाडू वृत्तीचा, खेळ भावनेचा अपमान होता. त्यापेक्षा तुम्हा दोघींना दुखवणे मला अधिक सयुक्तिक वाटले. माझ्या या गुन्ह्याची तुम्हाला वाटेल ती शिक्षा द्या मला!’’
अर्थात दोघींनीही आनंदानं बादशहाला आलिंगन दिलं. दोघीही एकत्र बादशहाच्या मिठीत असताना धाकटी मोठीला म्हणाली, ‘‘बिरबल भावजी आहेत तोवर आपले अवाजवी हट्ट पूर्ण होणार नाहीत!’’ आणि ते ऐकून बादशहाही मस्त हसला!

1 comment:

  1. हाय गौरव आत्ताच मराठी ब्लॉगविश्ववर तुझा ब्लॉग पाहिला..तुझा मेलआयडी दिसला नाही म्हणून इथे कमेंन्ट करत आहे. प्लीज sanmitra4@gmail.com या आयडीवर तुझं नाव आणि सब्जेक्ट क्रिकेट लिहून नुसता एक मेल कर. मी तुला पुढे रिप्लाय करून माहिती पाठवेन. तुझ्या क्रिकेट लिखाणासंबंधी एक चांगली संधी उपलब्ध आहे.. plz delete d comment afterwards

    ReplyDelete