मराठी पेपर मधून काही निवडक लेखाची कात्रणे तुमच्यासाठी - All क्रेडीट goes to respective writer
Sunday, May 2, 2010
ताटातलं पोटापर्यंत कधी पोहचणार?
स्त्रिया ‘सुशिक्षित’ आहेत का? मिळालेल्या, मिळविलेल्या संधीतून त्या यशस्वी होत असल्या, तरी त्या स्वत:च्या आणि भोवतीच्या वास्तवाचा विचार करतात का? वास्तवात परिवर्तन घडविण्यासाठी त्याला त्या सामोऱ्या जातात का? वरवर बघता त्यांच्यात दिसणारी ‘आधुनिकता’ त्यांच्या मनाच्या तळापर्यंत झिरपली आहे का? की त्याही गतीच्या, चंगळवादाच्या, बाजारीकरणाच्या लाटेवर स्वार झाल्या आहेत? आज त्यांच्यासमोर अनेक संधींचं ताट वाढलेलं आहे. परंतु खरंच ते त्यांच्या पोटात जाणार आहे का?
महाराष्ट्रातील स्त्रीचा दर्जा, तिची प्रतिष्ठा यांचा विचार करताना एका दारुण वास्तवाकडे दुर्लक्ष करणं अशक्य आहे. एक प्रश्न विचारावासा वाटतो की, स्त्रिया कुठे आहेत आणि त्या कुठे दिसेनाशा होताहेत? ज्यांना भारतीय संस्कृतीत मोठय़ा आदराचं स्थान आहे, असं गर्वाने ऐकवलं जातं त्या स्त्रिया पुरुषांच्या संख्येच्या तुलनेत झपाझपा दृष्टीआड कशा होताहेत? गेल्या १०० वर्षांत लोकसंख्येतलं स्त्री-पुरुषांचं गुणोत्तर काय सांगतं? १९०१ साली १००० पुरुषांच्या बरोबर ९७१ स्त्रिया होत्या. २००१ साली त्या सरासरीने ९२७ आणि महाराष्ट्रात काही सधन जिल्ह्यांत ८०० पेक्षाही खाली आहेत! ‘वंशाला दिवा’ या पुरुषप्रधान मानसिकतेला याचा विसर पडला का, की हा दिवा देण्यासाठी तरी स्त्रिया हव्यात ना?
महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवाच्या या टप्प्यावर आणखी एका भीषण वस्तुस्थितीकडे बघणं, त्याला सामोरं जाणं आणि उपाययोजना करणं अग्रक्रमाने व्हायला हवं. ज्या स्त्रिया दिसेनाशा न होता, गर्भातच खुडल्या न जाता जन्मल्या, वाढल्या, शिकल्या वा न शिकल्या, पण पोटापाण्याच्या उद्योगाला लागल्या, त्या तरी जगण्याच्या वाटेवर निर्धास्तपणे चालू शकताहेत? सुरक्षित समजलं जाणारं घर हे घरातल्यांच्या हिंसाचाराने कित्येकांसाठी असुरक्षित झालंच आहे; पण आता घरात आणि रस्त्यावर दोन्हीकडे स्त्रिया गुंडांच्या, गुन्हेगारांच्या अत्याचाराच्या बळी ठरताहेत. जागतिकीकरण, खासगीकरण, बाजारीकरण यांनी गरिबी आणि श्रीमंतीत वाढलेली अपार मोठी दरी आणि त्यातून निर्माण झालेली झटपट आणि खूप पैसे मिळविण्याची हाव- यातून वाढत्या वेगानं फैलावणाऱ्या गुन्हेगारीमुळे जन्मल्यानंतरही स्त्रीला पुरुषापेक्षाही अधिक धोका आहे! त्यांना बलात्कारातलं ‘सुख’ स्त्रीदेहच देऊ शकतो!
महाराष्ट्रातल्या स्त्रियांकडे नजर टाकली तर अनेकदा महाराष्ट्राबाहेरच्या लोकांकडून असं ऐकायला मिळतं की, इथल्या स्त्रीचा पोशाखापासून वागण्या-बोलण्यापर्यंतचा बाजच वेगळा आहे! काही प्रमाणात यात तथ्य असेलही. शिक्षण, नोकरी, घराबाहेरच्या जगात वावरण्याचा आत्मविश्वास, इतर राज्यांच्या तुलनेतली ‘आधुनिकता’ या तिच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र, या शिकलेल्या मुली/स्त्रिया सुशिक्षित आहेत का? मिळालेल्या, मिळविलेल्या संधीतून त्या यशस्वी होत असल्या तरी त्या स्वत:च्या आणि भोवतीच्या वास्तवाचा विचार करतात का? वास्तवात परिवर्तन घडविण्यासाठी त्याला त्या सामोऱ्या जातात का? वरवर बघता त्यांच्यात दिसणारी ‘आधुनिकता’ मनाच्या तळापर्यंत झिरपली आहे का? की त्याही या गतीच्या, चंगळवादाच्या, बाजारीकरणाच्या लाटेवर स्वार झाल्या आहेत? आजूबाजूच्या जगाच्या या प्रकारच्या प्रवाहापासून दूर राहणं सोपं नाहीच; पण तरी त्या ते करत आहेत का? जुन्या स्त्रिया स्त्रीच्या पारंपरिक प्रतिमेच्या गुलाम ठरल्या आणि नव्या- या पोकळ आणि खोटय़ा आधुनिकतेच्या बळी आहेत, असं म्हणावं का?
..तरीसुद्धा नानाविध सवलती आणि संधींच्या रूपानं जणू एक भरलं ताट स्त्रियांच्या पुढय़ात येत आहे. घरातल्या सगळ्यांची जेवणं झाल्यावर उरलंसुरलं खाऊन, पाणी पिऊन ढेकर देणारी यापूर्वीची स्त्री- तिच्या पुढय़ात आलेल्या या ताटावर अनेकांच्या अनेकविध नजरा लागून राहिल्या आहेत. म्हणूनच मनात येतं, या ताटातलं तोंडात पडून पोटापर्यंत पोहचण्यासाठी स्त्रियांना अजून किती काळ वाट बघावी लागणार आहे?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment