राज्यभर सगळीकडे धुवाँधार पाऊस सुरू होता. सर्व नद्या दुथडी भरून वाहत होत्या. सगळे व्यवहार थंडावले होते. रस्त्यांवर वर्दळ नव्हती. दुकाने बंद होती. बादशहा आपल्या महालाच्या नक्षीदार झरोख्यातून आभाळाची माया बरसताना पाहत होता. भरपूर पाऊस पडत असल्याने तो वारंवार परवर दिगारचा शुक्रियाही अदा करीत होता. एकूणच काही कामकाज नसल्याने तो दोन बेगम व त्यांच्या मुलांसाठी वेळ देत होता. मुलांनी आग्रह केला तेव्हा त्यांनी त्यांची गोष्टीची पुस्तके वाचली. जादूच्या, राक्षसांच्या, राजा-महाराजांच्या, राजपुत्रांच्या, शूरवीरांच्या अशा प्रकारच्या भरपूर गोष्टी त्याने मजेने वाचल्या आणि मग अचानक त्याच्या लक्षात आले, सर्व गोष्टींचे शेवट ‘आणि ते सुखाने नांदू लागले’ असाच असे. बादशहा विचार करू लागला आणि मग त्याला ते अधिकच खटकू लागले. त्याने सांस्कृतिक मंत्र्याला तातडीने बोलावून घेतले व ‘बाल साहित्याची स्थिती कशी आहे?’ असा प्रश्न केला. मंत्री खरे तर हादरलाच. बादशहाला अचानक बाल साहित्याच्या स्थितीची चिंता का पडावी आणि त्याच्या मनात नेमके काय आहे ते त्याला कळत नव्हते आणि तसे स्पष्ट सांगण्या- विचारण्याचीही सोय नव्हती. मंत्री कामाला लागला व त्याने दोन दिवसांत बादशहाला आपला अहवाल सादर केला. ‘‘हुजूर, आपल्या राज्यात बालकथा लिहिणारे साधारणत: पाचशे लेखक आहेत. वर्षभरात जवळपास ३ हजार पुस्तके प्रकाशित होतात आणि त्यातल्या उत्कृष्ट पुस्तकांना आपण पुरस्कारही देतो’’ बादशहानं नाराजीनं मान हलविली आणि म्हणाला, ‘‘यापैकी बहुतांश कथांचे शेवट.. आणि ते सुखानं नांदू लागले.. अशा वाक्यानं होतो. लहान मुलांची ही दिशाभूल आहे. दु:ख, निराशा, अपयश, अपेक्षाभंग हा जीवनाचा एक भाग आहे हे त्यांना कळू द्या, सर्व लेखकांना तसे आदेश द्या.’’ मंत्री हवालदिल झाला आणि मान हलवून ‘जी खाविंद’ म्हणाला. आठवडाभरानं पाऊस जरा कमी झाला आणि मंत्रिमंडळाची बैठक झाली तेव्हा बादशहानं मंत्र्याला पुढील कारवाईबाबत विचारणा केली. मंत्र्यानं बिरबलाकडे पाहिलं तेव्हा बिरबलानं त्याला, काळजी करू नकोस, असं नजरेनंच सांगितलं. बैठक संपल्यावर बिरबल बादशहाच्या समवेत राजवाडय़ावर गेला. त्याच्या आदेशाप्रमाणं तिथं एक नक्षीदार पेटी आधीच आणून ठेवलेली होती. बिरबलानं इशारा करताच सेवकांनी ती पेटी उघडली आणि सोनेरी नक्षीनं वेढलेली बादशहाची एक तस्वीर त्यातून काढली. बिरबलानं तसबिरीला हार घातला, समोर उदबत्त्या लावल्या आणि हात जोडले. ते पाहून बादशहा लाल होऊन संतापानं थरथरू लागला. ‘बिरबल, तू काय चालविलं आहेस हे?’ बिरबल शांतपणे म्हणाला, ‘हुजूर, मी, तुम्ही, आपण सगळेच कधी तरी मरणार आहोत. तुमच्या मुलांना आपण आताच हे सत्य सांगून टाकावं असं वाटलं मला!’ अर्थातच सर्व प्रकार बादशहाच्या ध्यानी आला व तो वरमला. बादशहाची ती मुद्रा पाहून बिरबल म्हणाला, ‘‘खाविंद, मुलांच्या निरागस भावविश्वाला वास्तवाचे चटके देणं म्हणजे सगळा आनंद घालवणं आहे. जगात खूप काही चांगलं आहे, अशी आशा त्यांच्या मनात निर्माण करणं आवश्यक असतं, ती मोठी होतात आणि या आशेच्या बळावरच वास्तवाला सामोरी जातात!’’ बादशहा म्हणाला, ‘सुखानं नांदू लागले’चं महत्त्व मला खरंच कळत नव्हतं. बिरबल हसत म्हणाला, ‘‘खाविंद, लहान मुलांच्या पुस्तकांविषयी तुम्ही एवढय़ा गांभीर्यानं विचार केला ते मला जास्त महत्त्वाचं वाटलं.’’ ढगाळ वातावरणात उत्तम प्रतीचा चहा घेण्यासाठी बिरबलानं मग आग्रह करून शिक्षण मंत्र्यालाही बोलावून घेतलं!
धन्यवाद लोकसत्ता ... .... Link to original article
No comments:
Post a Comment