Sunday, February 21, 2010

ज्या व्यक्ती अतिरेकी आणि असहिष्णू भूमिका घेतात त्यांना राज्यकारभार करायचा नसतो

मंत्रिमंडळाच्या कामकाजाचा मासिक आढावा घेणारी बैठक सुरू होती. प्रत्येक मंत्री आपापला अहवाल सादर करत होता. मंत्र्यांच्या समोर द्राक्ष्याचे तजेलदार घोस चांदीच्या तबकांमध्ये ठेवलेले होते. एकूण मंत्र्यांच्या कामगिरीवर बादशहा समाधानी होता. बिरबल शांतपणे प्रत्येक मंत्र्याचा अहवाल ऐकून टिपणं काढत होता. बैठक सुरू असतानाच अचानक बाहेर गोंगाट, घोषणाबाजी, दगडफेक अशी गडबड सुरू झाली. सुरक्षा यंत्रणा लगबगीनं कामाला लागली. बादशहाने सेवकाला बाहेर काय गडबड चालली आहे ते पाहून येण्यास सांगितले. सेवक गेला आणि परत येऊन म्हणाला, ‘खाविंद, बाहेर मोठ्ठा मोर्चा आहे, ऑस्ट्रेलियन, पाकिस्तानी खेळाडूंनी आपल्या देशात खेळायला येऊ नये, त्यांना अटकाव करावा.. अशी मागणी करीत आहेत ते!’ तोवर गृहमंत्र्यांनी जाऊन बंदोबस्ताची पाहणी करून काही आदेशही दिले होते. त्यामुळे बैठक शांततेत पार पडली.
बैठक संपल्यावर बादशहा आणि बिरबल शाही भोजनासाठी एकत्र गेले. मटारच्या करंज्या, हरभरा भात असा संपूर्ण शाकाहारी बेत होता. तोंडात तुकडा ठेवताच स्वादिष्ट सुखाची भावना भरून यावी अशा त्या करंज्यांचा आस्वाद घेता घेता बादशहा म्हणाला, ‘मला एक कळत नाही, अमूक देशांच्या खेळाडूंना इथं पाय ठेवायला देऊ नका, तमूक देशाशी खेळू नका अशी अतिरेकी भूमिका ही माणसं का घेतात? अरे हा काय पोरखेळ आहे का? राजकारण वेगळं असतं आणि खेळ, कला या गोष्टी वेगळ्या असतात!’
हरभरा भाताचा घास घेत, ताकाची वाटी हाती धरत बिरबल म्हणाला, ‘खाविंद, ही माणसं अशी अतिरेकी भूमिका घेतात हे तुमचं केवढं नशीब म्हणायचं?’ हे ऐकून बादशहा आश्चर्यानं म्हणाला, ‘आता ह्यात तुला माझं नशीब कुठं दिसलं?’
जिरे-हिंगाची मस्त फोडणी घातलेल्या ताकाचा घोट घेत बिरबल म्हणाला, ‘खाविंद,  ज्या व्यक्ती अतिरेकी आणि असहिष्णू भूमिका घेतात त्यांना राज्यकारभार करायचा नसतो. अशी माणसं सत्तेत येऊ नयेत याची काळजी लोकच घेत असतात. आणि खरं सांगायचं तर अशा मानसिकतेच्या व्यक्तींना सत्तेची जबाबदारी नकोच असते. त्यांना दहशतीचं एक समांतर साम्राज्य फक्त उभं करायचं असतं.. आणि अशी दहशत टिकविण्यासाठी ते देशभक्तीच्या भडक व्याख्या करीत अतिरेकी भूमिका घेत राहतात..!’
बादशहा खाता खाता थांबून विस्मयानं सगळं ऐकत होता. बिरबलाचं तर्कशुद्ध विश्लेषण ऐकून त्याचा चेहरा खुलून आला व तो बिरबलाला म्हणाला, ‘म्हणजे फार काळजी करण्याची गरज नाही!’ करंजीचा शेवटचा घास घेत बिरबल म्हणाला, ‘काळजी करण्याची गरज नाही, पण काळजी घेतली पाहिजेच!’ ‘सुभानअल्लाह क्या बात कही बिरबल’ असं म्हणत बादशहानं आपल्या हातानं आणखी दोन करंज्या बिरबलाच्या ताटात घातल्या!

Sunday, February 7, 2010

भावनांचं राजकारण हे अंमली पदार्थाच्या सेवनासारखं असतं

‘जो या राज्यात जन्मला तोच या राज्याचा, बाकी सर्व उपरे!’ एका तरुण नेत्यानं जोरदार गर्जना केली. लाखो हातांनी टाळ्यांचा कडकडाट केला. समूहाच्या मनात जणू ‘आपण कुणीतरी खास आहोत’ अशी रोमांचक भावना निर्माण झाली. या भावनेचे पडसाद राज्यभर उमटू लागले. बादशहाकडे या बातम्या पोहोचत होत्या व हळूहळू त्याची अस्वस्थता वाढत होती. ‘सलग १५ वर्षे ज्याचे वास्तव्य या राज्यात आहे तो अधिकृत’ असं एकेकाळी म्हटलं जात होतं. परंतु अलिकडे ‘आपला आणि उपरा’ यांच्या व्याख्या बदलल्या, स्वरूपही बदलले होते. त्यामुळं सलोख्याला सुरूंग लागला होता. काहीतरी करायला हवं, असं बादशहाला वाटू लागलं आणि त्यानं बिरबलाला बोलावणं पाठवले. ‘सगळं काही आलबेल आहे, बादशहानं कशाला बरं बोलावलं असेल’ असा विचार करीत बिरबल बादशहाकडे पोचला. ‘खाविंद, आपण याद केलीत माझी?’
बादशहा म्हणाला, ‘मला फार काळजी वाटते आहे, राजधानीतलं वातावरण गढुळलं आहे, मनामनात अदृश्य भिंती उभ्या राहत आहेत.’
बिरबल म्हणाला, ‘खाविंदांनी निश्चिंत असावं, जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे!’
बादशहाला बिरबलाचं उत्तर ऐकून आश्चर्य वाटलं. ‘अरे, जो या राज्यात जन्मला तोच इथला, अशी अतिरेकी घोषणा देण्यापर्यंत मजल गेली आहे, आणि तू म्हणतोस मी निश्चिंत असावं!’
बिरबल हसला आणि म्हणाला, ‘खाविंद, भावनांचं राजकारण हे अंमली पदार्थाच्या सेवनासारखं असतं. त्याचा डोस सतत वाढवत राहावा लागतो. आणि एक वेळ अशी येते की, डोस कितीही वाढवला तरी त्याची किक बसत नाही. म्हणूनच म्हटलं, डोस वाढवला जातोय म्हणजे अगदी योग्य दिशेनं चाललं आहे राजकारण!
बिरबलाचा हा तर्क ऐकून बादशहा गोंधळला. जरा अविश्वासानंच म्हणाला, ‘पण खरंच असं होईल?किक बसणार नाही,अशी वेळ येईल? बिरबल शांत स्वरात म्हणाला, ‘खाविंद या नेत्याच्या पूर्वसूरींना अखेर अंमली पदार्थाचा ब्रँड बदलून राजकारण करण्याची वेळ आली होती हे विसरू नका!’ आणि मग बादशहा निर्धास्त झाला व म्हणाला, ‘चहा नामक मादक पेय चालेल का तुला आत्ता?’ अर्थात बिरबलाने ते आमंत्रण आनंदाने स्वीकारलं!

Monday, February 1, 2010

काही प्रसंग असे असतात, ते साजरे करावेच लागतात, त्यातून जगण्याची उभारी मिळते, संघर्षांला बळ प्राप्त होते

दिवाळीच्या सुमारास बादशाह आणि बिरबल रात्रीच्या वेळी राजधानीचा एक फेरफटका मारण्यास निघाले. सगळीकडे प्रकाशाचं साम्राज्य पसरलेलं होतं. रंगीबेरंगी दिव्यांनी आकाश व्यापलं होतं. दारादारात तेला-तूपाचे दिवे लागलेले होते. महागडय़ा वस्त्रांची दुकानं गर्दीनं तुडुंब भरलेली होती. जिथं-तिथं ‘डिस्काऊंट सेल’ लागलेले होते आणि तिथं अधिकच गर्दी होती. सुगंधी फवारे, सुगंधी तेले, उटणे यामुळं आसमंत सुगंधाच्या विविधतेत न्हाला होता. फराळाच्या पदार्थाची दुकानं पिशव्या भरभरून पदार्थ विकत होती. शिवाय घराघरात तळणी-भाजणी सुरू होतीच. मूलं-माणसं फटाक्यांचा, शोभेच्या दारूचा आनंद लुटत होती. हे सर्व पाहता पाहता बादशाह अचानक थबकला आणि बिरबलाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, ‘‘एकूण मला तुम्ही जे काही रिपोर्ट्स देता ते सगळे खोटे आणि फसवे असतात तर!’’ बिरबल म्हणाला, ‘‘ तुम्हाला काय म्हणायचे आहे खाविंद?’’ बादशहा घुश्शातच म्हणाला, ‘‘महागाई, मंदी, नोकरकपात, दुष्काळ, नापिकी, भ्रष्टाचार यामुळं जनता त्रस्त आहे असं तू मला नेहमी सांगत असतोस.. आणि प्रत्यक्षात तर जनता आनंदी दिसते आहे. केवढा उत्साह आहे दिवाळीचा? कुठं आहे तुझी ती महागाई? कुठं आहे मंदी?’’ बिरबल काहीच बोलला नाही, कारण बादशहाचा पारा खूपच चढलेला होता. बादशहाला जरा वेळानं बिरबलानं निरोपाचा कुर्निसात केला तेव्हाही तो रागातच होता. आठवडाभरानं बिरबल पुन्हा बादशहाच्यासमोर बसलेला होता. बादशहाच्या सत्ता स्थापनेचा वर्धापनदिन धुमधडाक्यात साजरा करायचा होता त्याविषयी विचार करण्यासाठी ही बैठक होती. बैठक सुरू झाली आणि मोठय़ा बेगमची दासी धावत आली. म्हणाली, ‘‘बेगमच्या अब्बाजानची तब्येत खूपच खालावली आहे.’’ ते ऐकून बिरबल म्हणाला, ‘‘खाविंद, अशा स्थितीत आपण सत्ता स्थापनेचा वर्धापनदिन करू नये!’’ त्यावर बादशहा म्हणाला, ‘‘बिरबल, काही प्रसंग असे असतात, ते साजरे करावेच लागतात, त्यातून जगण्याची उभारी मिळते, संघर्षांला बळ प्राप्त होते.’’ हे ऐकून बिरबल हसला आणि म्हणाला, ‘‘लोक दिवाळी साजरी करताना, असाच विचार करतात खाविंद!’’ बादशहा चमकचा आणि दासीकडे पाहून म्हणाला, ‘‘अगं मोठय़ा बेगमच्या अब्बाजानच्या इंतकाल (निधन) तर गेल्यावर्षीच झाला ना?’’ आणि मग बिरबलाकडे पाहत म्हणाला, ‘‘आम्हाला धडा शिकवलात ना, चला आता वर्धापनदिनाची तयारी करू या!

एनी पब्लिसिटी इज ए गूड पब्लिसिटी

गेले काही दिवस राज्यात मोठाच गदारोळ सुरू झाला होता. वृत्तपत्रे, वाहिन्यांवर एक चर्चा सुरू होती. अमूक चित्रपटातील दृश्यांवर एका नेत्याने कात्री चालवणे भाग पाडले. मग त्या चित्रपटाचे खास खेळ रोज वेगवेगळ्या नेत्यांसाठी होऊ लागले. कधी त्या नेत्याचा एखाद्या संवादावर आक्षेप असे तर कधी त्या नेत्याचे भक्त दुखावत. मग त्यांच्या मर्जीप्रमाणे चित्रपटात बदल करत असल्याची घोषणा केली जात असे. नेते आणि त्यांचे भक्त सदैव तोडफोडीची भाषा करत प्रसंगी तोडफोड करीतही होते.
मग एका चित्रपटाच्या शिर्षकावर कोणाची तरी खप्पामर्जी झाली. पुन्हा धमकावण्याची भाषा, ‘अमूक करू, तमूक करू’ची भाषा. निर्मात्याची धावाधाव आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची हाती पेन धरून किंवा माईक धरून धावपळ.हे सगळं पाहून बादशहा जाम वैतागला. ‘चित्रपटात काय दाखवणं योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे ठरविण्यासाठी एक समिती आहे ना नेमलेली, मग हे सगळं कशासाठी?’ असं बादशहा करवादून म्हणाला. बिरबलानं मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक यांची अवस्था, नेत्यांची उद्दाम भाषा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची नव्यानं होत असलेली चर्चा यामुळं बादशहा सतत त्याच गोष्टींचा विचार करत होता.
अखेर बादशहानं बिरबलाला विचारलं, ‘यावर आपण काही तरी करावं, या हस्तक्षेपाला पायबंद घालावा, असं तुला नाही का वाटतं?’
बिरबल म्हणाला, ‘खाविंद, आज घडीला जेवढय़ा चित्रपटांची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे त्यातील दहा चित्रपटांची नावं काढूया.’ तशी काढण्यात आली. मग बिरबल म्हणाला, ‘आता आपले गुप्तहेर या दहा निर्मात्यांच्या, दिग्दर्शकांच्या घरी पाठवा आणि अहवाल मागवा.’ बादशहाने बिरबलाची ती सूचनाही अंमलात आणण्याचे फर्मान सोडले. अहवाल आल्यावर बिरबलाने गुप्तहेर खात्याच्या प्रमुखाला विचारले, ‘आपला निष्कर्ष सांगा.’ बादशहाला कुर्निसात करून गुप्तहेर प्रमुख म्हणाला, ‘जहांपनाह, हे सर्वच्या सर्व दहा निर्माते रोज देवाला प्रार्थना करीत आहेत, देवा, आमच्या चित्रपटाबद्दलही काही तरी वाद होऊ देत!’
बादशहाला आश्चर्य वाटलं. बिरबल म्हणाला, ‘एनी पब्लिसिटी इज ए गूड पब्लिसिटी, हे आजचं घोषवाक्य आहे खाविंद. अशी प्रसिद्धी झाली की लोक चित्रपटाला हमखास गर्दी करतात. त्यामुळं हे प्रकार अनेकदा संगनमतानं होतात. कधी कधी ते खरेही असतात.’
बादशहा आश्चर्यानं म्हणाला, ‘अल्लाह, हे असे आहे तर! मग लोकशिक्षणाची खरी गरज आहे.’
बिरबल हसत हसत म्हणाला, ‘खाविंद, लोकशिक्षण हे आयुर्वेदासारखं आहे, एक तर त्याचा प्रभाव जाणवायला काळ जावा लागतो आणि दुसरं म्हणजे, त्याची मात्रा  प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार वेगवेगळी द्यावी लागते!’
आयुर्वेदाची उपमा बादशहाला बेफाम आवडली. तो हसत हसत बिरबलाला म्हणाला, ‘चल, काढा घेऊ या!

Wednesday, January 20, 2010

लोकशाहीची यंत्रणा चालायला हवी ना? आपल्यापुढं जे पर्याय आहेत त्यातून एक निवडायचा आणि अधिक चांगल्या पर्यायाची वाट पाहायची!

नागरिकांनी मतदानासाठी मोठय़ा प्रमाणात बाहेर पडावे, मतदानाच्या दिवशी पिकनिकला वगैरे जाऊ नये, भयमुक्त मतदान करावे म्हणून स्वत: बादशहा आवाहन करत होता. बिरबलानेही ठिकठिकाणी सभा घेऊन नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. परंतु एका बुद्धिवाद्याने या उलट प्रचार सुरू केला. ‘सगळे उमेदवार भ्रष्ट आहेत, खोटारडे आहेत, मतलबी आहेत, तेव्हा मतदान करू नका.’ सामान्य माणूस अनेकदा आवश्यक असेल तेव्हा चिरीमिरी देऊन स्वत:ची कामे करून घेतो, परंतु नेत्यांच्या भ्रष्ट आचाराविषयी जागरूक असतो. त्यामुळं, मतदानाला विरोध करणाऱ्या बुद्धिवाद्याच्या सभांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला. ते पाहून बादशहा काळजीत पडला. बिरबलही विचारात पडला. मग बिरबलानं त्याची चौकशी यंत्रणा कामाला लावली. चौकशी पूर्ण झाल्यावर बिरबलानं बुद्धिवादी नेत्याला भोजनाचं निमंत्रण दिलं. गप्पा-टप्पा, चर्चा असं बरंच काही झाल्यावर रात्री उशीरा सगळ्यांना सपाटून भूक लागली. मग जेवण वाढलं जाऊ लागलं. बुद्धिवाद्याकडे पाहून बिरबल म्हणाला, ‘माफी असावी. आपण नॉनव्हेज खात नाही आणि व्हेजमध्ये सुध्दा तुमची नावडती वांग्याची, भेंडीची भाजी आहे. तेव्हा आपण आज जेवला नाहीत तरी चालेल!’ बुद्धिवादी म्हणाला, ‘अहो, आता एव्हढय़ा रात्री निवड करायला कुठं वेळ आहे, पोट भरलं नाही तर शरीराची यंत्रणा कशी चालेल?’ बिरबल हसत हसत म्हणाला, ‘माझंही तेच म्हणणं आहे. लोकशाहीची यंत्रणा चालायला हवी ना? आपल्यापुढं जे पर्याय आहेत त्यातून एक निवडायचा आणि अधिक चांगल्या पर्यायाची वाट पाहायची!’ बुद्धिवादी खजिल झाला आणि त्यानं मसाल्याची वांगी ताटात वाढून घेतली. अर्थातच मतदानविरोधी चळवळ त्यानं बंद केली. बिरबलाची ‘डिनर डिप्लोमसी’ बादशहाला बेफाम आवडली आणि त्यानं बिरबलाला ‘रेशमी कबाब’चा आस्वाद घेण्यासाठी आमंत्रित केलं!

Tuesday, January 19, 2010

इतिहासातील चुकांमधून वर्तमानाने धडा घ्यायचा तर इतिहास जसाच्या तसा लिहिला जाणं आवश्यक नाही का?

बादशहानं आपल्या मुलाचं इतिहासाचं पाठय़पुस्तक सहज म्हणून चाळलं आणि ते वाचता वाचता तो भयंकर संतापला. पाठय़पुस्तकात बादशहाच्या कर्तृत्ववान खापर पणजोबांवर एक धडा होता. त्या धडय़ात बादशहाच्या खापर पणजोबांविषयी दिलेली काही माहिती बादशहाला रुचली नाही. बादशहानं संतापून ते पुस्तक भिरकावून दिलं आणि बिरबलाला बोलावणं धाडलं. बादशहाला एवढं संतापलेलं बिरबलानं कधीच पाहिलेलं नव्हतं. ‘खाविंद, एवढं संतापायला काय झालंय आज?’ असं त्यानं विचारताच बादशहानं इतिहासाच्या पुस्तकातील धडय़ाविषयी त्याला सांगितलं. बिरबल म्हणाला, ‘खाविंद, राज्यकर्त्यांची आणि सत्ताधिशांची मर्जी सांभाळणारे, लाळघोटे इतिहासकार आपल्या राज्यात नाहीत, याचा तुम्हाला खरं तर अभिमान वाटायला हवा!’ बादशहा म्हणाला, ‘परंतु हे सगळं खोटं आहे! बिरबल म्हणाला, ‘ठीक आहे, मग काय करावं, अशी तुमची इच्छा आहे?’ बादशहा म्हणाला, ‘हे सर्व बदलून टाका, माझ्या खापरपणजोबांविषयी काय लिहायचं ते मीच सांगेन! बादशहाच्या आदेशानुसार नवा इतिहास लिहिण्याचं काम सुरू करण्यात आलं. त्यानंतर चार दिवसांनी बादशहा आणि बिरबल सकाळी फिरायला गेले असताना बादशहाला ठेच लागली आणि त्याचं पायाचं बोट रक्ताळलं. राजवाडय़ावर परत आल्यावर बादशहाचा धाकटा मुलगा त्याच्या पायाकडे पाहत म्हणाला, ‘अब्बाजान, काय झालं?’ बादशहाला बोलण्याची संधी न देता बिरबल म्हणाला, ‘‘रस्त्यात एक साप आडवा आला, खाविंदांनी त्याला लाथेनं उडवलं. त्यामुळे बोटाला जखम झाली. मुलानं बापाकडे अभिमानानं पाहिलं आणि तो बापाचा पराक्रम आईला सांगण्यासाठी घरात पळाला. बादशहा विस्मयानं बिरबलाकडे पाहत म्हणाला, ‘‘अरे त्याला खोटं का सांगितलंस! खरं सांगितलं असतं तर त्या रस्त्यानं दगड आहेत, सांभाळून चाललं पाहिजे हे तरी त्याला कळलं असतं!’
बिरबल म्हणाला, ‘खाविंद, पुढं भविष्यात तुमचा एखादा खापर पणतू खोटा इतिहास लिहिल, त्यापेक्षा आपण आताच त्याची व्यवस्था केलेली बरी!’
अर्थात बादशहा हे ऐकून वरमला. त्याची ती स्थिती पाहून बिरबल म्हणाला, ‘खाविंद, राज्यकर्त्यांमध्ये आणि समाजाच्या नेतृत्वामध्येच जर इतिहास पचवण्याची ताकद नसेल तर समाजात ती कुठून येणार? आणि इतिहासातील चुकांमधून वर्तमानाने धडा घ्यायचा तर इतिहास जसाच्या तसा लिहिला जाणं आवश्यक नाही का?’ बादशहा हे ऐकून खिन्न झाला, कारण त्याची विवेकबुद्धी शाबूत होती.

Tuesday, January 12, 2010

समाजाला लांच्छनास्पद असलेल्या गोष्टी जगाला सांगणं, उजेडात आणणं हे कोणत्याही कलेचं एक महत्त्वाचं काम आहे

बादशहाच्या दरबारातील एका कलावंतानं राज्याबाहेर जाऊन आपल्या नाटय़कृतीचे प्रयोग केले आणि त्या नाटय़कृतीचं सगळीकडे प्रचंड कौतुक झालं. त्या नाटकाला अनेक राज्यांमध्ये सन्मानित केलं गेलं. तो कलावंत आपला संच घेऊन राज्यात परतला तेव्हा राज्यातही त्याचं मोठं स्वागत करण्यात आलं. बादशहानं त्या नाटय़कृतीच्या लेखकाचा, दिग्दर्शकाचा आणि कलावंतांचा दरबारी सन्मान करायचं ठरवलं. ह्य़ा सत्कार सोहळ्याला मंत्री, त्यांचे कुटुंबीय आणि सामान्य नागरिकांनीही खच्चून गर्दी केली. बादशहा आपल्या दोन्ही बेगमसह उपस्थित होता. आधी त्या नाटकाचा रंगतदार प्रयोग झाला. टाळ्यांच्या कडकडाटात दिग्दर्शक मंचावर उपस्थित झाला. खुद्द बादशहानं त्याच्या सर्जनशीलतेला लवून कुर्निसात केला. शाही सन्मान प्रदान करण्याची घटीका आली आणि एक दरबारी पंडीत रागाने थरथरत उभा राहिला व म्हणाला, ‘खाविंद, आपल्या राज्यातील गरीबी आणि गरिबांची वस्ती या नाटकात दाखविली आहे. या नाटकाचा सन्मान करून इतर राज्यांनी आपल्याला खिजवलं आहे, हिणवलं आहे. तेव्हा आपणही याचा सन्मान करणं हा मूर्खपणा आहे असं मला वाटतं.’ त्या पंडिताच्या हुषारीचा दराराच असा होता की, उपस्थित अंतर्मूख झाले. अनेकांच्या चेहऱ्यावर चलबिचल दिसू लागली. बादशहाच्या नजरेचा इशारा ओळखून बिरबल उठून उभा राहिला व त्या पंडिताला म्हणाला, ‘आपण आम्हाला आदरणीय आहात. मी एक प्रश्न विचारू का?’ पंडितानं होकार दिल्यावर बिरबल म्हणाला, ‘ही गरीब वस्ती म्हणजे काय आहे असं वाटतं आपल्याला?’ पंडीत विजयी मुद्रेनं म्हणाला, ‘राज्याच्या सुदृढ शरीराला आलेली किळसवाणी गाठ आहे ती!’ बिरबल हसत उत्तरला, ‘मग गाठ लपवून ठेवणं राज्याच्या हिताचं आहे की ती जगाला दाखवून तिच्यावर इलाज करणं हिताचं आहे?’ प्रश्न ऐकून पंडिताचा चेहरा उतरला. ती संधी घेत बिरबल म्हणाला, मला वाटतं, समाजाला लांच्छनास्पद असलेल्या गोष्टी जगाला सांगणं, उजेडात आणणं हे कोणत्याही कलेचं एक महत्त्वाचं काम आहे. ते या नाटय़कृतीनं केलं आहे. आता त्यावर उपाय शोधण्याचं पुढलं काम आपण करायचं आहे.’ टाळ्यांचा कडकडाट झाला आणि बादशहानं बिरबलाकडे कृतज्ञतेचा कटाक्ष टाकत कार्यक्रम पुढं सुरू केला.